गृहप्रकल्पाची माहिती देण्यास टाळाटाळ, सिडकोकडे केला अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 12:44 AM2020-01-10T00:44:30+5:302020-01-10T00:44:47+5:30
खांदा वसाहतीतील बस टर्मिनल्सच्या आरक्षित जागेवर सिडकोकडून गृहनिर्माण प्रकल्प बांधण्यात येत आहेत.
कळंबोली : खांदा वसाहतीतील बस टर्मिनल्सच्या आरक्षित जागेवर सिडकोकडून गृहनिर्माण प्रकल्प बांधण्यात येत आहेत. या प्रकल्पाला रहिवासी, लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. सिडकोने परस्पर गृहप्रकल्पाचा निर्णय घेतल्याने याबाबत माहिती मागितली असता, सिडकोकडून टाळाटाळ करण्यात आल्याचे माजी नगरसेवक शिवाजी थोरवे यांनी सांगितले.
खांदा वसाहतीतील सेक्टर ८ येथील भूखंड क्रमांक ११ हा सिडकोच्या शहर नियोजनानुसार बस टर्मिनल्ससाठी राखीव होता. मात्र, या ठिकाणी बस टर्मिनल्स तयार करण्यात आले नाही. आता पंतप्रधान आवास योजनेसाठी सिडकोने खाली बस टर्मिनल्स व वरती घर बांधण्याचे नियोजन केले आहे.
काही दिवसांपूर्वी सिडकोने मोठी मोहीम राबवून भूखंडावरील मच्छीमार्केट, इतर दुकाने हटवली. आता भूखंडाला चहुबाजूंनी पत्रे लावून ठेकेदाराने जागा काबीज केली आहे. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात खंड पडल्याने वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळाच्या वतीने नाराजी व्यक्त झाली.
बसटर्मिनल आणि टॉवर उभारण्यात येणार असल्याने विरोधी वातावरण निर्माण झाले आहे. नियोजनानुसार बांधकाम केले नाही तर सर्वसामान्य नागरिकांवर सिडकोकडून कारवाई करण्यात येते. त्यांना सीसी आणि ओसी दिली जात नव्हती. मग शहर नियोजनानुसार या ठिकाणी बस टर्मिनल्स असताना वरती घरे कशी काय बांधली जात आहेत, असा प्रश्न शिवसेनेचे शहरप्रमुख सदानंद शिर्के यांनी उपस्थित केला आहे.
खांदा वसाहतीतील सेक्टर ८ येथील भूखंडावर होणारा प्रकल्प, आरक्षण या विषयी माजी नगरसेवक शिवाजी थोरवे यांनी, सिडकोच्या नियोजन विभागाकडे माहिती मागितली आहे. त्यासाठी १ नोव्हेंबर २०१९ रोजी अर्ज करण्यात आला होता. मात्र, अद्याप सिडकोकडून माहिती देण्यात आलेली नाही. अखेर त्यांनी ३१ डिसेंबर रोजी माहिती मिळत नसल्याने पुन्हा अपील केले आहे.
>गृहप्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन
खांदेश्वर रेल्वेस्थानकासमोरील गृहनिर्माण प्रकल्पाला विरोध करण्यात आला आहे. नागरी हक्क समितीबरोबर शिवसेनेने हा प्रकल्प इतर ठिकाणी हलविण्याची मागणी केली आहे. महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी आक्रमक भूमिका घेत पत्रे काढून वाट मोकळी करून दिली होती. बुधवारी खासदार श्रीरंग बारणे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन कामोठे येथील रहिवाशांच्या भावना कळवल्या. याबाबत ते काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे ध्यान लागून राहिले आहे.