नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून गेल्या वर्षी जाहिर करण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेतील प्रतिक्षा यादीतील अर्जदारांना सिडकोने दिलासा दिला आहे. प्रतिक्षा यादीतील अर्जदारांना अनामत रक्कम भरण्यासाठी ३0 आॅक्टोबरची मुदत देण्यात आली होती. बुधवारी ही मुदत संपली. मात्र सिडकोने ही मुदत ८ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे ज्या अर्जदारांना अनामत रक्कम भरता आली आहे, अशांना पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सिडकोने गेल्या वर्षी पंधरा हजार घरांची योजना जाहिर केली होती. या योजनेत यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना घरांचे ताबापत्रे देण्यात आली आहेत. पुढील वर्षापासून टप्या टप्याने या अर्जदारांना घरांचा प्रत्यक्ष ताबा दिला जाणार आहे. त्यानंतर याच योजनेतील प्रतिक्षा यादीतील अर्जदारांना सुध्दा १ ते ३0 आॅक्टोबर या कालवाधीत अनामत रक्कम भरण्याचे आवाहन करण्यात आले होती. परंतु विविध कारणांमुळे अनेक अर्जदारांना दिलेल्या मुदतीत अनामत रक्कमेचा भरणा करता आलेला नाही. त्यामुळे सिडकोने आता ही मुदत ८ नोव्हेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. संबधित अर्जदारांनी दिलेल्या मुदतीत अनामत रक्कमेचा भरणा करावा, असे आवाहन सिडकोच्या वतीने केले आहे.
सिडकोच्या शिल्लक ८१४ आणि नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या ९ हजार घरांसाठी आतापर्यंत १ लाख ३ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या घरांसाठी दिवाळीच्या पाच दिवसांत तब्बल वीस हजार अर्ज प्राप्त झाल्याचा दावा सिडकोने केला आहे.गेल्या वर्षी १५ हजार घरांची यशस्वी सोडत काढल्यानंतर सिडकोने आता ९५ हजार नवीन घरांची घोषणा केली आहे. यापैकी ९ हजार २४९ घरांसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू केली आहे. त्याचबरोबर स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील शिल्लक ८१४ घरांसाठीसुद्धा अर्ज मागविण्यात आले आहेत. शिल्लक घरांसाठी आतापर्यंत ३३ हजार ५0४ तर नव्या प्रकल्पातील घरांसाठी ६९ हजार ४२३ अर्ज प्राप्त झाल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.