नवी मुंबईत महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल; भाजपाची तटस्थ भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 02:54 AM2017-11-04T02:54:28+5:302017-11-04T02:54:37+5:30
महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी कोणाला मिळणार याविषयीची उत्सुकता शुक्रवारी संपली. महापौर पदासाठी दोन व उपमहापौर पदासाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. भाजपाने तटस्थतेची भूमिका घेतल्याने शिवसेनेने ऐनवेळी उमेदवार बदलला.
नवी मुंबई : महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी कोणाला मिळणार याविषयीची उत्सुकता शुक्रवारी संपली. महापौर पदासाठी दोन व उपमहापौर पदासाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. भाजपाने तटस्थतेची भूमिका घेतल्याने शिवसेनेने ऐनवेळी उमेदवार बदलला. कॉंग्रेसमध्ये उपमहापौर पदासाठी बंडखोरी होऊन दोन अर्ज दाखल झाले आहेत.
नवी मुंबई महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रस व शिवसेनेमध्ये चुरस निर्माण झाली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने विद्यमान सभागृहनेते जयवंत सुतार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रतिस्पर्धी शिवसेनेकडून विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचे नाव आघाडीवर होते. परंतु भाजपाने ऐनवेळी तटस्थतेची भूमिका घेतल्याने शिवसेनेचे सत्ता स्थापनेचे स्वप्न धुळीस मिळाले व चौगुलेंऐवजी सोमनाथ वास्कर यांना उमेदवारी देण्यात आली. सेनेच्या वतीने उपमहापौर पदासाठी गटनेते द्वारकानाथ भोईर यांनी अर्ज दाखल केला.
राष्ट्रवादी व कॉंग्रेसची महापालिकेमध्ये आघाडी आहे. उपमहापौर कॉंग्रेसच्या कोट्यात आहे. जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती भगत यांची उमेदवारी अंतिम समजली जात होती. परंतु शेवटच्या क्षणी पक्षाने प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांचे निष्ठावंत रमाकांत म्हात्रे यांच्या पत्नी मंदाकिनी म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे नाराज झालेल्या भगत गटाच्या वतीने वैजयंती भगत यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उघडकीस आली आहे. ९ नोव्हेंबर रोजी महापौर पदासाठी मतदान होणार आहे.
महापौरपदासाठी दाखल अर्ज
जे. डी. सुतार : राष्ट्रवादी कॉंग्रेस
सोमनाथ वास्कर : शिवसेना
उपमहापौर
मंदाकिनी रमाकांत म्हात्रे :
कॉंग्रेसचे अधिकृत
वैजयंती दशरथ भगत :
कॉंग्रेस बंडखोर
द्वारकानाथ भोईर : शिवसेना
महापालिकेतील पक्षनिहाय संख्या
राष्ट्रवादी कॉंग्रेस ५२
शिवसेना ३८
कॉंग्रेस १०
भाजपा ६
अपक्ष ५