सिडकोच्या घरांसाठी अर्जाची मुदत संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 02:03 AM2019-11-06T02:03:13+5:302019-11-06T02:03:25+5:30
९,२४९ घरे : ९५ हजार अर्ज दाखल
नवी मुंबई : सप्टेंबर महिन्यात सिडकोच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील घरनोंदणीची मुदत मंगळवारी संपली. स्वप्नपूर्ती प्रकल्पातील शिल्लक राहिलेली ८१४ आणि नवीन प्रकल्पातील ९,२४९ घरांसाठी जवळपास ९५ हजार अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, मंगळवारी अखेरच्या दिवशी सुमारे दहा हजार अर्ज सिडकोला प्राप्त झाले आहेत.
सिडकोच्या घरांना आजही चांगली मागणी आहे. त्यानुसार सिडकोने आगामी काळात दोन लाख घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील नऊ हजार घरांसाठी सप्टेंबरमध्ये अर्ज मागविण्यात आले होते. तसेच स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील शिल्लक राहिलेल्या ८१४ घरांसाठीही आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज सादर करण्यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मंगळवारी रात्री ११ वाजता ही मुदत संपली. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत एकूण ९४,२६४ अर्ज प्राप्त झाल्याचे सिडकोच्या पणन विभागाचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत डावरे यांनी सांगितले. यात स्वप्नपूर्तीच्या शिल्लक घरांसाठी २६,३८९ तर नवीन गृहप्रकल्पातील घरांसाठी ६७,८७५ अर्ज प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षी सिडकोच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या १५ हजार घरांच्या योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. एक लाख ८१ हजार अर्ज प्राप्त झाले होते. या वेळीही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे डावरे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या घरांसाठी २६ नोव्हेंबर रोजी संगणकीय सोडत काढली जाणार आहे.