नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सिडकोच्या ९0 हजार घरांसाठी अर्ज विक्री सुरू करण्याचे संकेत सिडकोच्या संबंधित विभागाने दिले आहेत. त्यामुळे मागील सोडतीत संधी हुकलेल्या ग्राहकांना घरासाठी पुन्हा एकदा नशीब आजमावता येणार आहे. सध्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार साधारण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घरांसाठी प्रत्यक्ष अर्ज विक्री सुरू करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
सिडकोने गेल्या वर्षी पंधरा हजार घरांची योजना जाहीर केली. अल्प उत्पन्न आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या या गृहप्रकल्पातील घरांसाठी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रभरातून सुमारे दोन लाख अर्ज दाखल झाले होते. घरांची वाढती मागणी लक्षात घेऊन सिडकोने आणखी ८९ हजार ७७१ घरांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांशी घरे सर्वसामान्य ग्राहकांना समोर ठेवून उभारली जाणार आहेत. एकूण घरांपैकी ३५ टक्के घरे पंतप्रधान आवास योजनेसाठी राखीव असणार आहेत. यातील सर्वाधिक घरे दक्षिण नवी मुंबईत असणार आहेत. या गृहयोजनेच्या माध्यमातून बांधकाम सुरू असतानाच घरांची विक्री ही नवीन संकल्पना अमलात आणण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घेतला आहे. त्यानुसार प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आली आहे. या गृहप्रकल्पाच्या उभारणीसाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. या निविदा ५ जुलै रोजी उघडण्यात येणार होत्या; परंतु केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळ परिघातील इमारतींच्या उंचीची मर्यादा काहीशी शिथिल केल्याने प्रस्तावित केलेल्या ९0 हजार घरांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे निविदाधारकांना आणखी वेळ देण्यात आला आहे. परिणामी या महिन्याच्या अखेरीस प्राप्त निविदा उघडून महागृहनिर्मितीच्या पहिल्या टप्प्यातील कंत्राटदारांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे. यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याअगोदर म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून घरांच्या अर्ज विक्रीला सुरुवात केली जाईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
टप्प्याटप्प्याने घरांचा ताबासिडकोच्या प्रस्तावित ९0 हजार घरांच्या मूळ प्रस्तावात साधारण ३७६ नवीन घरांची भर पडली आहे. यातील ५३ हजार ४९३ घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असणार आहेत, तर उर्वरित ३६ हजार २८८ घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्याने या घरांची निर्मिती करून ग्राहकांना त्याचा ताबा देण्याची सिडकोची योजना आहे.
किमतीत वाढ नाहीशहरातील प्रमुख रेल्वे स्थानके, ट्रक टर्मिनल्सबाहेरील पार्किंगच्या जागांवर ट्रान्सझिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंट अंतर्गत या घरांची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, तळोजा येथील भूखंड निश्चित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सिडकोच्या मागील गृहयोजनेतील घरांच्या किमती १६ ते ३0 लाखांच्या दरम्यान होत्या. प्रस्तावित महागृहप्रकल्पातील अल्प व दुर्बल घटकासाठी असलेल्या घरांच्या किमती गेल्या वर्षी इतक्याच ठेवल्या जाण्याची शक्यता आहे.