नवी मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोने जाहीर केलेल्या ७,८४९ घरांच्या योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत १२ हजारांपेक्षा अधिक ग्राहकांनी घरासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी केली आहे. अर्ज सादर करण्याची गुरुवारची अर्थात २२ डिसेंबरची शेवटची मुदत आहे. असे असले तरी ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केली आहे.
खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकांच्या परिसरात विविध घटकांसाठी ही घरे उपलब्ध करण्यात आली आहेत. खासगी विकासकांपेक्षा ही घरे खूपच वाजवी दरात असल्याचा दावा सिडकोने केला आहे. परिवहन केंद्रित विकास या संकल्पनेवर आधारित या सदनिका विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असून, त्यांची किंमत ३० ते ३५ लाखांदरम्यान आहे. अर्जासोबत ७५ हजार अनामत रक्कम भरण्याची अट घातली आहे. अर्ज भरण्याची २२ डिसेंबर ही अंतिम मुदत असली तरी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा विचार सिडकोचे व्यवस्थापन करीत आहे.