सहा वर्षांनंतर सभापतीची नियुक्ती, मुंबई बाजारसमितीवर मराठवाड्याला दुसऱ्यांदा संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 01:47 AM2020-09-01T01:47:37+5:302020-09-01T01:47:47+5:30
देशातील कृषी व्यापाराची सर्वाधिक उलाढाल मुंबई बाजारसमितीमध्ये होत असते. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ व राज्यातील ३०५ बाजारसमित्यांची शिखर संस्था म्हणूनही बाजारसमितीची ओळख आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : सहा वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीवर सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली आहे. ४३ वर्षांमध्ये दहा जणांना हे पद भूषविण्याची संधी मिळाली असून, मराठवाड्याला दुसऱ्यांदा मान मिळाला आहे. सभापतीपदाचा प्रश्न सुटल्यामुळे धोरणात्मक निर्णय घेण्यास न्यायालयाने घातलेली बंदी उठणार असून, रखडलेली विकास कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
देशातील कृषी व्यापाराची सर्वाधिक उलाढाल मुंबई बाजारसमितीमध्ये होत असते. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ व राज्यातील ३०५ बाजारसमित्यांची शिखर संस्था म्हणूनही बाजारसमितीची ओळख आहे. मुंबईमधील कृषी व्यापार स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. शासनाने जानेवारी, १९७७ मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीची स्थापना करून सर्व कृषी व्यापार एका छत्राखाली आणला. पा. शी देशमुख यांची पहिले सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली. एक महिन्यानंतर कि़ बा. म्हस्के यांची सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली. बाजारसमितीचे काम चांगले सुरू झाले असतानाच, मुंबईमधील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी बाजारसमिती नवी मुंबईत स्थलांतरिच करण्याचा निर्णय घेण्यात आला व टप्प्याटप्प्याने सर्व बाजारपेठा स्थलांतरित केल्या आहेत. ४३ वर्षांमध्ये तब्बल दहा जणांनी सभापतीपद भूषविले आहे. बाजारसमितीचे संचालक होण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाºयांमध्ये चढाओढ असते. नाशिकचे देवीदास पिंगळे खासदार असताना मुंबई बाजारसमितीवर संचालक होते. पुणे जिल्ह्यातील आमदार कुमार गोसावी यांनीही सभापतीपद भूषविले आहे. जिंतूरचे यापूर्वीचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी सभापतीपद भूषविले असून, अनेक वर्षे ते बाजारसमितीवर संचालक होते. माजी मंत्री शशिकांत शिंदे हेही बाजारसमितीवर अनेक वर्षांपासून संचालक आहेत.
डिसेंबर, २०१४ मध्ये शासनाने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. प्रशासकीय मंडळांनी धोरणात्मक निर्णय घेऊ नये, यासाठी काही सामाजिक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने प्रशासकांना धोरणात्मक निर्णय घेण्यास निर्बंध घातले होते. शासनाने वेळेत निवडणूक घेतली नसल्याने तब्बल सहा वर्षे प्रशासकीय राजवट सुरू राहिली. या काळात कांदा-बटाटा मार्केटची पुनर्बांधणी व इतर सर्व धोरणात्मक प्रकल्पांचे काम ठप्प झाले होते. बाजारसमितीच्या विकासाला गती मिळत नव्हती. सभापतीपदाचा प्रश्न सुटल्यामुळे रखडलेले प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संचालक मंडळ कसे काम करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
असे असते संचालक मंडळ : मुंबई बाजारसमितीवर १८ लोकनियुक्त संचालक असतात. त्यांच्यामध्ये सहा महसूल विभागातून प्रत्येकी दोन असे १२ शेतकरी प्रतिनिधी. पाच व्यापारी प्रतिनिधी व एका कामगार प्रतिनिधीचा समावेश असतो. सभापती व उपसभापतींची निवड झाल्यानंतर शासन पाच सदस्यांची नियुक्ती करते. मुंबई व नवी मुंबई महापालिकेचा प्रत्येकी एक प्रतिनिधी, पणन संचालक व बाजारसमिती सचिव असे एकूण २७ जणांचे संचालक मंडळ असते.
विद्यमान संचालक पुढीलप्रमाणे : मुंबई बाजारसमितीवर सद्यस्थितीमध्ये अशोक डक(सभापती), धनंजय वाडकर (उपसभापती), बाळासाहेब सोळसकर, प्रभाकर पाटील, राजेंद्र पाटील, प्रवीण देशमुख, माधवराव जाधव, सुधीर कोठारी, हुकुमचंद आमधरे, अद्वय हिरे, जयदत्त होळकर, वैजनाथ शिंदे, शंकर पिंगळे, अशोक वाळुंज, नीलेश वीरा, विजय भुत्ता, संजय पानसरे व माथाडी नेते शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे.
बाजार समितीच्या स्थापनेपासूनचे सभापती
नाव कार्यकाळ
पा. शि. देशमुख जानेवारी, १९७७ ते फेब्रुवारी, १९७७
कि़ बा. म्हस्के फेब्रुवारी, १९७७ ते जानेवारी, १९८१
व्ही. जी. शिवदारे जानेवारी, १९८१ ते फेब्रुवारी, १९८४
व्ही. के. बोरावके मार्च, १९८६ ते मार्च, १९८८
रामप्रसाद बोर्डीकर मार्च, १९८८ ते एप्रिल, १९९५
कुमार गोसावी डिसेंबर, २००१ ते फेब्रुवारी, २००५
द्वारकाप्रसाद काकाणी फेब्रुवारी, २००५ ते जानेवारी, २००८
दिलीप काळे डिसेंबर, २००८ ते आॅगस्ट, २०१०
बाळासाहेब सोळसकर सप्टेंबर, २०१० ते डिसेंबर, २०१४
अशोक डक आॅगस्ट २०२० पासून पुढे