मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेल्या मार्केटचीच डागडुजी, एपीएमसीची पक्षपाती भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 05:24 AM2018-09-29T05:24:44+5:302018-09-29T05:24:52+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका महिन्यात दोन वेळा मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यांच्या स्वागतासाठी बाजार समिती प्रशासनाने फळ व कांदा-बटाटा मार्केटमधील रस्त्यांची दुरुस्ती केली.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका महिन्यात दोन वेळा मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यांच्या स्वागतासाठी बाजार समिती प्रशासनाने फळ व कांदा-बटाटा मार्केटमधील रस्त्यांची दुरुस्ती केली. अर्धवट रंगरंगोटीही केली; परंतु धान्यसह मसाला मार्केटमधील समस्यांकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. बाजार समितीच्या या पक्षपाती भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.
माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कामगार मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुख्यमंत्री येणार असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने बाहेरील रोडवरील सर्व खड्डे बुजविले. बाजार समिती प्रशासनानेही मार्केटमधील रोडवरील सर्व खड्डे तत्काळ बुजविले, पूर्ण मार्केटची साफसफाई केली. कुठेही कचरा, दुर्गंधी राहणार नाही, याची खबरदारी घेतली होती. मुख्यमंत्र्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट असल्याची जाणीव होईल, यासाठी आवश्यक ती सर्व कामे करण्यात आली होती. यापूर्वी ३ सप्टेंबरला पतसंस्थेच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री फळ मार्केटमध्ये आले होते. त्या वेळीही मार्केटमध्ये जाणाऱ्या नाल्यावरील पुलाची डागडुजी करण्यात आली. रोडचे डांबरीकरण करण्यात आले. या रोडवर अनेक महिन्यांपासून पडलेले डेब्रिजचे ढिगारे उचलण्यात आले. फळ मार्केटच्या मध्यवर्ती सुविधागृह इमारतीची दुरवस्था राज्याच्या प्रमुखांना दिसू नये, यासाठी त्यांची दृष्टी जाईल तेवढ्याच भागाची रंगरंगोटी करण्यात आली. नवीन रंग लावण्याचा केलेला दिखावा सद्यस्थितीमध्ये बाजार समितीमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठीच त्यांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरच डागडुजीची कामे करण्यात आली.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. यामुळे धान्य, मसाला, कांदा-बटाटा, भाजी व फळ या पाचही मार्केटमधील व्यापाºयांनी समस्या सोडविण्याची मागणी केली की, न्यायालयाच्या आदेशाचे कारण देऊन कामे टाळली जात आहेत. सर्वच मार्केटमध्ये गटारांची स्थिती बिकट आहे. धान्य व मसाला मार्केटमधील रोडची कामे रखडली आहेत. विद्युत केबल खराब झाल्या आहेत. अवैध पार्किंगमुळे कचरा वेळेत उचलता येत नाही. फक्त मंत्र्यांना खूश करण्यासाठी ते येणार असलेल्या मार्केटमध्ये खड्डे बुजविण्यासह केलेल्या इतर कामांमुळे नाराजी वाढली आहे. येथील व्यापारी व कामगारांपेक्षा मंत्र्यांची मर्जी सांभाळण्याला प्रशासन महत्त्व देत असल्याची टीकाही खासगीमध्ये केली जात आहे.
इतर मार्केटकडे दुर्लक्ष : मुख्यमंत्री येणार असल्यामुळे फळ व कांदा-बटाटा मार्केटमधील कामे करण्यास प्राधान्य देण्यात आले; परंतु धान्य, मसाला व भाजी मार्केटमध्ये याच दक्षतेने कामे करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. मुख्यमंत्री येणार म्हणून, मुख्य प्रशासक सतीश सोनी, सचिव ए. के. चव्हाण व सर्व अभियंत्यांनी मार्केटची पाहणी करून तातडीने डागडुजीची कामे केली; पण इतर मार्केटकडे मात्र त्याच पद्धतीने कामे न केल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री येणार असल्यामुळे केलेली कामे
फळ मार्केटमधील नाल्यावरील पुलाची डागडुजी
पुलापासून मध्यवर्ती सुविधागृह इमारतीपर्यंत रोडचे डांबरीकरण
मध्यवर्ती सुविधागृह इमारतीच्या ठरावीक भागांची रंगरंगोटी
कांदा-बटाटा मार्केटमधील लिलावगृहाची डागडुजी
मार्केटमधील रोडवरील खड्डे बुजविण्यात आले
मार्केटची विशेष साफसफाई व औषध फवारणी करण्यात आली.
अर्धवट रंगकाम
फळ मार्केटमधील मध्यवर्ती सुविधागृह इमारतीच्या काही भागांना रंग लावण्यात आला. अशाप्रकारे अर्धवट रंगकाम का करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कांदा मार्केटमध्येही प्रशासक व सचिवांनी भेट दिल्यानंतर रंगरंगोटी करण्याचे आदेश दिले होते; परंतु वेळ कमी असल्यामुळे रंगरंगोटीवरील खर्च टळला.
आंदोलनानंतर कामे सुरू
बाजार समितीला सर्वाधिक उत्पन्न देणाºया धान्य मार्केटमधील रोडची कामे अनेक वर्षांपासून रखडली होती.
खोदलेल्या रोडमुळे वारंवार वाहतूककोंडी होत होती. वारंवार विनंत्या करून व पत्रव्यवहार करूनही कामे होत नसल्यामुळे माथाडीनेते नरेंद्र पाटील यांना आंदोलन करावे लागले होते. आंदोलनानंतर धान्य मार्केटमधील रोडची कामे करण्यासाठी कार्यवाही सुरू झाली आहे.