नवी मुंबई : महापालिका निवडणुकीपूर्वी जास्तीत जास्त विकासकामांना मंजुरी देण्यासाठी प्रशासनाने सुरुवात केली आहे. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ४४ कोटी रुपयांच्या ३६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.अडवली-भूतावलीत आदिवासी नागरिकांसाठी गृहप्रकल्प राबविण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यांना २२ घरे उपलब्ध करून देण्यासाठी दोन कोटी ४१ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. एक वर्षामध्ये घरांचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. सीवूडमधील गणपतशेठ तांडेल मैदानाची सुधारणा करण्याचा निर्णयही पालिकेने घेतला आहे. सीबीडीमधील सुनील गावस्कर मैदानामधील जुने व्यासपीठ पाडून नवीन बांधण्यात येणार आहे. वाशीमधील नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी मैदानांसाठी स्वतंत्र धोरण असावे, अशी मागणी केली. डॉ. जयाजी नाथ यांनी सीबीडीमधील राजीव गांधी मैदानाची योग्य पद्धतीने देखभाल केली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.जुईनगरमधील नादुरुस्त मलनि:सारण वाहिनी बदलण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवक रंगनाथ औटी यांनी केली असून लवकरात लवकर प्रस्ताव आणला नाही तर आंदोलनाचा इशाराही वेळी दिला आहे. नगरसेविका सरोज पाटील यांनी आयकर वसाहतीमधील मलनि:सारण वाहिनींचे काम मार्गी लावावे, अशी मागणी केली.
स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ४४ कोटी रुपयांच्या ३६ प्रस्तावांना मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 12:00 AM