नवी मुंबई :नवी मुंबईच्या बेलापूरसह खारघर-कामोठेहून कल्याण-डोंबविलीसह अंबरनाथ बदलापूरला जाण्यासाठी लवकरच शाॅर्टकट रस्ता होणार आहे. हा प्रवास सुखकर करण्यासाठी सिडको तळोजा नदीवर पूल बांधणार असून त्यास सीआरझेड प्राधिकरणाने परवानगी देऊन हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी परिवेश समितीकडे पाठविला आहे. यामुळे या पुलाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.
सध्या कल्याण-डोंबविलीसह अंबरनाथ बदलापूरला जाण्यासाठी महापे मार्गे किंवा जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील कळंबोली जंक्शन, शीळफाटा जंक्शनसह एमआयडीसीतील वाहतूककोंडी छेदून जावे लागते. यात मोठ्या प्रमाणात पैसा, वेळ, इंधन वाया जाते. शिवाय आवाजासह वायूप्रदूषणासही सामोरे जावे लागते. यामुळे सिडकोने आपल्या विकास आराखड्यात सायन-पनवेल महामार्गाने खारघरहून पेंधर-पाचनंद -तळोजा असा पूल प्रस्तावित केला आहे. तो पाचनंद येथे साडेबारा टक्के अंतर्गत वितरीत केलेल्या वसाहतीसह तळोजा एमआयडीसीला जोडून पुढे थेट कल्याण-डोंबविलीसह अंबरनाथ बदलापूरला जाणाऱ्या रस्त्यास जोडला जाणार आहे.
७०,१८४ चौरस मीटर वनजमीन जाणारया पुलासाठी ७०,१८४ चौरस मीटर वन जमीन जाणार आहे. यात ४,९३२ चौरस मीटर क्षेत्र सीआरझेडमध्ये मोडत नसून उर्वरित क्षेत्र सीआरझेडमध्ये येते. त्यामुळे हा प्रस्ताव सीआरझेडकडे सिडकोने पाठविला होता. त्यावर चर्चा करून मंजुरी देताना पुढील कार्यवाही तो स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ॲथोरिटी अर्थात परिवेश समितीकडे पाठविला आहे. यासाठी ०.०७४५ हेक्टर क्षेत्रावरील खारफुटी बाधित होणार असल्याने पर्यायी लागवडीसाठी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पनवेल तालुक्यातील तुर्भे येथे जमीन दिली आहे. त्यासाठीचा लागवड खर्च सिडको मॅंग्रोव्ह सेलकडे जमा करणार आहे.
२० पिलरचा असणार पूलतळोजा नदीवरील प्रस्तावित पूल २० पिलरचा असेल. यातील दोन पूल प्रत्यक्षात नदीत टाकावे लागणार आहे. यामुळे पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होणार नाही, स्थानिक मच्छीमारांसह स्थलांतरीत आणि स्थानिक पक्ष्यांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यासह बांधकाम करताना परिसरात लेबर कॅम्प टाकण्यास मनाई केली आहे.
तीन एमआयडीसी जोडल्या जाणारया पुलामुळे तळोजासह डोंबिवली आणि अंबरनाथ या तीन एमआयडीसी जोडल्या जाणार आहेत. त्याचा फायदा याठिकाणी कच्च्या मालाची आणि तयार मालाची ने-आण करणाऱ्या अवजड वाहनांना होणार आहे. या तिन्ही एमआयडीसी नवी मुंबईसह पुणे व गोवा हायवे आणि जेएनपीए बंदर आणि नियोजित नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळास जोडल्या जातील.