पनवेल : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’मध्ये सहभागी आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविकांना अतिरिक्त भत्ता देण्याचा ठराव बुधवारी पार पडलेल्या ऑनलाइन स्थायी समिती सभेत मंजूर झाला. नवनियुक्त सभापती संतोष शेट्टी यांची ही पहिलीच सभा होती. या सेविकांना महिन्याला २३०० रुपये भत्ता मिळणार आहे.
या ठरावाबाबत विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे व सभागृह नेते परेश ठाकूर या सत्ताधारी, विरोधकांचे एकमत झालेले पाहावयास मिळाले. शेकाप नगरसेवक रवींद्र भगत यांनी कोविडबाबत पालिका कोणत्या उपाययोजना राबवत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. या सभेत कोरोना रुग्णांची दैनंदिन नोंदणी करणे व पालिकेचे पोर्टल अद्ययावत करण्याची व्यवस्था न झाल्याने मे. सोलीस इन्क्वीटी कन्सल्टन्सी या एजन्सीला मुदतवाढ, कोविड सेंटरमध्ये रुग्णांना अत्यावश्यक साहित्य उपलब्ध करून देणे आदी महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. स्थायी समितीचे वार्तांकन करण्यास यापूर्वी पत्रकारांना परवानगी नव्हती. सभापती शेट्टी यांनी पत्रकारांना वार्तांकनास परवानगी दिली.
कामाच्या दर्जावर प्रश्नतळोजा येथील गावालगत बांधण्यात येणाऱ्या १०९ मीटरच्या नाल्याच्या सुमारे ४ कोटी रुपयांच्या कामाच्या ठेकेदाराच्या नियुक्तीला मंजुरी दिली. यासाठी एल. टी. पाटील ॲण्ड सन्स कंपनीने १८ टक्के कमी दराने निविदा सादर केली आहे. एवढ्या कमी दराची निविदा मंजूर केल्यास दर्जा टिकेल का, असा प्रश्न नगरसेविका सारिका भगत यांनी उपस्थित केला. कामाच्या दर्जाकडे बारकाईने लक्ष द्या, मी विकासकामांची पाहणी करणार असे, सभापती संतोष शेट्टी यांनी सांगितले