रुग्णालयात उद्वाहन बसवण्यास मंजुरी, पालिका रुग्णालयात रुग्णांची गैरसोय टळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 03:44 AM2017-08-20T03:44:00+5:302017-08-20T03:44:04+5:30
पालिकेच्या प्रथमसंदर्भ रुग्णालयातील जुन्या उद्वाहन (लिफ्ट) बदलण्यात येणार आहेत. यासंबंधीच्या ठरावाला शुक्रवारी झालेल्या महासभेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार लवकरच निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
नवी मुंबई : पालिकेच्या प्रथमसंदर्भ रुग्णालयातील जुन्या उद्वाहन (लिफ्ट) बदलण्यात येणार आहेत. यासंबंधीच्या ठरावाला शुक्रवारी झालेल्या महासभेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार लवकरच निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
वाशीतील पालिका रुग्णालयातील सध्याच्या लिफ्ट (उद्वाहन) बदलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सुमारे १८ वर्षांपूर्वी या लिफ्ट बसवलेल्या असल्याने वारंवार त्यांची दुरुस्ती करावी लागत आहे. यानंतरही त्या बंद पडत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय होत आहे. तसेच रुग्णांच्या भेटीसाठी आलेले आरोग्य समिती सभापतींसह अनेक महत्त्वाच्या व्यक्ती यापूर्वी रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकल्याही आहेत. त्यामुळे एखाद्या गंभीर रुग्णाची एका मजल्यावरून दुसºया मजल्यावर ने-आण करताना लिफ्ट बंद पडल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झालेली होती. याची दखल घेत पालिका प्रशासनाने रुग्णालयात चार नव्या लिफ्ट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. चारही लिफ्ट २० व्यक्तींच्या क्षमतेच्या व स्ट्रेचर नेता येतील, अशा आकाराच्या असणार आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या महासभेत मंजुरीसाठी आला होता. या वेळी नगरसेविका सरोज पाटील, नगरसेवक मनोहर मढवी, नामदेव भगत यांनी या प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रशासनाला काही सूचना व बदलही सुचवले. यानुसार चर्चेअंती महापौर सुधाकर सोनवणे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. महासभेच्या मंजुरीनंतर लवकरच निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या चारही लिफ्टकरिता प्रशासनाने अंदाजे १ कोटी ११ लाख ५६ हजार रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. त्याकरिता तीन नामांकित कंपन्यांकडून दरपत्रक मागवण्यात आले आहे. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या नव्या लिफ्ट रुग्णालयात बसवल्या जाणार आहेत. त्यानंतर लिफ्टअभावी रुग्णालयातील रुग्णांची व नातेवाइकांची एका मजल्यावरून दुसºया मजल्यावर होणारी गैरसोय टळणार आहे.