‘नैना’च्या आराखड्याला फेब्रुवारीत मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2016 02:23 AM2016-01-09T02:23:14+5:302016-01-09T02:23:14+5:30
शासनाकडे पाठवलेल्या नैना प्रकल्पाच्या आराखड्याला १५ फेब्रुवारीपर्यंत मंजुरी मिळेल, असा विश्वास सिडकोचे उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी व्यक्त केला
नवी मुंबई : शासनाकडे पाठवलेल्या नैना प्रकल्पाच्या आराखड्याला १५ फेब्रुवारीपर्यंत मंजुरी मिळेल, असा विश्वास सिडकोचे उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी व्यक्त केला आहे. तसेच खालापूरची अधिक ११ गावे नैना प्रकल्पात सहभागी होण्यास इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले. क्रेडाई बिल्डर्स असोसिएशन आॅफ नवी मुंबईच्या वतीने वाशीत भरवलेल्या मालमत्ता प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली.
क्रेडाई बिल्डर्स असोसिएशन आॅफ नवी मुंबईच्या वतीने वाशीत सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १६ वे मालमत्ता प्रदर्शन भरवण्यात आले आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात १५० हून अधिक विकासकांनी सहभाग घेतला आहे. त्याशिवाय विविध बँका व वित्त संस्थांनीदेखील त्या ठिकाणी स्टॉल मांडून गृहकर्जाचे विविध पर्याय नागरिकांसाठी खुले केले आहेत. या प्रदर्शनाचे उदटन शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी सिडको उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया, आमदार मंदा म्हात्रे, बीएएनएमचे अध्यक्ष धर्मेंद्र कारिया, हेमंत लखानी, हरेश छेडा, रसिक चौहान, देवांग त्रिवेदी आदी विकासक उपस्थित होते. यावेळी सिडकोने शासनाकडे पाठवलेल्या नैना क्षेत्राच्या आराखड्याला १५ फेब्रुवारीपर्यंत मंजुरी मिळेल, असा विश्वास भाटीया यांनी व्यक्त केला. तर खालापूरची अधिक ११ गावेदेखील नैना क्षेत्रात सहभागी होण्यासाठी तयार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय वांद्रा-कुर्लाच्या धर्तीवर खारघर येथे सेंट्रल पार्कलगत इंटरनॅशनल फायनान्स सेंटर उभारणे विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रदर्शनात अधिकाधिक विकासकांनी साऊथ नवी मुंबईतले प्रस्तावित गृहप्रकल्प नागरिकांच्या पसंतीसाठी मांडले आहेत. नैना क्षेत्रामुळे घरांची मागणी वाढणार आहे. यामुळे पनवेल ते खोपोलीदरम्यान घर खरेदीची मोठी संधी प्रदर्शनात उपलब्ध असल्याचे बीएएनएमचे अध्यक्ष धर्मेंद्र कारिया यांनी सांगितले. चार दिवसीय प्रदर्शनाला किमान १ लाख नागरिक भेट देण्याची शक्यता आहे. घर बुकींगद्वारे सुमारे २ हजार कोटींचा व्यवहार होईल, असा विश्वाही कारिया यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)