सिडकोच्या नैना प्रकल्पातील तिसऱ्या टीपी योजनेला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 01:36 AM2019-11-05T01:36:56+5:302019-11-05T01:37:24+5:30
पहिल्या टप्प्याच्या विकासाला गती : चिपळे, काप्रोली, नेरे, विहिघर, मोहो गावांतील ४३४ हेक्टर क्षेत्रफळाचा समावेश
नवी मुंबई : नैनाच्या पहिल्या टप्यातील २३ गावांच्या विकास आराखड्याला चालना देण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. टीपी स्कीम अर्थात नगररचना परियोजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्यात चिपळे, कोप्रोली, नेरे, विहीघर व मोहो या गावातील ४३४ हेक्टर क्षेत्राचा समावेश असलेल्या तिसºया टीपी स्कीमला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मंजुरी दिली आहे.
नैनाच्या तिसºया टिपी स्कीमला मंजुरी मिळाल्याने आता राज्य सरकार मध्यस्थाची (आर्बिटरेटर) नियुक्ती करणार आहे. त्यांच्या माध्यमातून जमिनीधारकांकडून घ्यावयाची जमीन, त्याबदल्यात संबधित भूधारकांना देय असलेल्या भूखंडांचे सिमांकन करणे तसेच अधिनियमात ठरविलेल्या अन्य मुद्यांचा अभ्यास करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. नैना क्षेत्राच्या विकासाकरीता आतापर्यंत मंजूर झालेल्या पहिल्या तीन नगरचना परियोजनांमुळे एकूण ६४८ हेक्टर क्षेत्राचा नियोजित विकास आराखडा तयार झाला आहे. या तीन नगररचना योजनेंतर्गत २५0 हेक्टर क्षेत्रफळावर एकूण ८३0 अंतिम भूखंड जमीन मालकांना विकासासाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. याशिवाय शाळांसाठी १७ भूखंड राखीव असून ७७ हेक्टर जमीनीवर उद्याने आणि खेळाची मैदाने विकसित केली जाणार आहेत. ५२ किमी लांबीच्या रस्त्यांचे प्रस्तावित असून २६ हेक्टर जमीन ही सामाजिक सुविधांसाठी आणि ३५ हेक्टर जमीन ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या गृहनिर्मित्तीसाठी राखीव आहे. याशिवाय क्रीडांगण, अग्निशमन केंद्र, पोलीस ठाण्यासाठी ६ हेक्टर जमीन राखीव ठेवण्यात आली आहे.
एप्रिल २0१४ मध्ये नैना क्षेत्रातील २३ गावांचा समावेश असलेल्या पहिल्या टप्याचा विकास आराखडा मंजूर झाला. तेव्हापासून केवळ ६४८ हेक्टर क्षेत्राचे नियोजन पूर्ण झाले आहे. यापूर्वीच घोषित केलेल्या आणखी चार नगररचना परियोजना
शासन स्तरावर मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.
तिसरी मुंबई दृष्टिपथात ...
१0 जानेवारी २0१३ रोजी अधिसूचित झालेल्या नैना क्षेत्रात ४७४ चौ. कि.मी. परिसराचा समावेश आहे. नागरी विकासाचे नैना मॉडेल तयार करताना या क्षेत्रात तिसरी मुंबई निर्माण करण्याच्या दृष्टीने सिडकोने नियोजन सुरू केले आहे. मुंबई, नवी मुंबईलगतच नैना क्षेत्र असल्याने भविष्यात २0 लाखांहून अधिक घरांची निर्मिती या क्षेत्रात केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी, तळोजा एमआयडीसी, रिलायन्स एसईझेड, सिडको विकसीत क्षेत्र आदी नैना क्षेत्राला लागूनच असल्याने या परिसराच्या विकासला गती मिळणार आहे.
वीस वर्षांत विकासाचे उद्दिष्ट्य
नैना क्षेत्राचा पहिला टप्पा पुढील सात वर्षांत पूर्ण केला जाणार आहे. त्यासाठी तब्बल सात हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे, तर दुसºया टप्यातील पायाभूत सुविधांवर सिडकोने १२ हजार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. ही रक्कम नैना योजनेअंतर्गत भूधारकांकडून सिडकोला प्राप्त होणाºया ४0 टक्के भूखंडांपैकी १५ टक्के भूखंडांच्या विक्रीतून उभारली जाणार आहे.
सात हजार कोटींचा खर्च
नैना क्षेत्रात रस्त्यांचे जाळे उभारतानाच पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सिडको ७ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले. सडकोच्या या प्रकल्पाला प्रत्यक्ष साकारण्याकामी नगरविकास, महाराष्ट्र शासन, राज्य नगर व देश नियोजन विभाग, पुणे यांचे भरपूर सहकार्य लाभल्याचे ते म्हणाले.