नवी मुंबई : औषधांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर नियंत्रण ठेवून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने औषध विभाग सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची असते. ठाणे जिल्ह्यात औषध निरीक्षकांची पदे मंजूर असताना भरती न केल्याने उपलब्ध औषध निरीक्षकांवर कामाचा ताण वाढला आहे.
औषधांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीचा व्यवसाय सुरू करताना सुरक्षा कायद्यानुसार शासनाच्या अन्न व औषध विभागात त्याची नोंदणी करून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. औषधांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्री यांची वेळच्या वेळी तपासणी करण्याचे काम अन्न व औषध प्रशासनाचे आहे.
औषधी विक्रीची दुकाने, गोदामे किंवा औषध निर्मिती कारखाने यांची वेळोवेळी तपासणी एफडीएच्या माध्यमातून केली जाते. काही महिन्यांपूर्वी अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षकांसह इतर अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या झाल्या आहेत. सद्यस्थितीत औषध निरीक्षकांची राज्यात सुमारे २०० पदे मंजूर आहेत परंतु भरती रखडल्याने सद्य स्थितीत ८७ औषध निरीक्षकांवरच कामाचा गाडा सुरु आहे.
संपूर्ण विभागाची जबाबदारी केवळ १६ निरीक्षकांवरठाणे जिल्ह्यासाठी २२ पदे मंजूर असताना प्रत्यक्षात ६ औषध निरीक्षक कर्तव्यावर असून ठाणे विभागात एकूण ४२ पदे मंजूर असताना संपूर्ण विभागाची जबाबदारी फक्त १६ औषध निरीक्षकांवर आहे. औषध निरीक्षक पदे भरती होत नसल्याने कर्तव्यावर असलेल्या औषध निरीक्षकांवर कामाचा ताण वाढला असून औषधे विक्री करणाऱ्यांनादेखील विविध अडचणी येत आहेत. याबाबत ठाणे जिल्ह्याचे औषध संयुक्त आयुक्त दुष्यंत भामरे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.