नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे. उत्पन्नाचे साधन नसल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे कोणतेही सोयरसुतक न पाळता खासगी शाळांच्या व्यवस्थापनाने आॅनलाइन शिकविण्यासाठीसुद्धा भरमसाट फी वाढ प्रस्तावित केली आहे. ही फी न भरणाºया विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिकवणी नाकारली जात आहे. खासगी शाळांच्या या मनमानीला चाप लावण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा शाळा सुरू होण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने ऑनलाइन शिकवणीला परवानगी दिली आहे. परंतु खासगी शाळा व्यवस्थापनांनी आॅनलाइन क्लासेससाठीसुद्धा शाळेच्या नियमित फीचे निकष लावले आहेत. त्यानुसार पालकांकडून फी वसूल केली जात आहे. विशेष म्हणजे जे पालक फी भरणार नाहीत, त्यांच्या पाल्यांना आॅनलाइन शिकवणी नाकारली जात आहे. सानपाडा येथील एका प्रतिष्ठित खासगी शाळेच्या व्यवस्थापनाने फी न भरणाºया अनेक विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिकवणी देण्यास नकार दिल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यामुळे पालकांत संतापाची लाट पसरली आहे. भाजपचे पदाधिकारी पांडुरंग आमले यांनी या प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.शाळांवर कारवाईची मागणीलॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार न करता फीसाठी पालकांना वेठीस धरणाºया या शाळेच्या विरोधात फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. नवी मुंबईतील खासगी शाळांकडून फी वसुलीसाठी तगादा सुरू आहे.