सेंट जोसेफ शाळेची मनमानी सुरूच, पालकांनी केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 05:12 AM2018-06-16T05:12:32+5:302018-06-16T05:12:32+5:30
मोर्चे, आंदोलन, तसेच खुद्द शिक्षण संचालकांनी आदेश देऊनही शाळा व्यवस्थापनाने आपली मनमानी सुरूच ठेवल्याने संतप्त पालकांनी शुक्र वारी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यांनी मध्यस्थी करण्याची मागणी केली.
पनवेल - मोर्चे, आंदोलन, तसेच खुद्द शिक्षण संचालकांनी आदेश देऊनही शाळा व्यवस्थापनाने आपली मनमानी सुरूच ठेवल्याने संतप्त पालकांनी शुक्र वारी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यांनी मध्यस्थी करण्याची मागणी केली. आयुक्तांनी देखील सकारात्मक चर्चा करीत याप्रकरणात नक्कीच पालकांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आश्वासन या वेळी दिले.
शाळा व्यवस्थापन फीवरून पालकांना मानसिक त्रास देत आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल देत नसल्याची तक्र ार या वेळी पालकांनी आयुक्तांकडे केली. विशेष म्हणजे फीवाढीवरून शाळा प्रशासनाला शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहिरे यांनी लेखी पत्र देखील पाठविले आहे. तरीही शाळा आपल्या आडमुठ्या धोरणावर ठाम आहे. मागील दोन वर्षांत फी न भरलेले आणि उर्वरित फी भरण्यासाठी पालक शाळेत गेले. मात्र, शाळा व्यवस्थापन शिक्षण विभागाच्या आदेशाने फी स्वीकारण्यास अजूनही तयार नाही. याउलट फी न भरलेल्या जवळजवळ ६००हून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल शाळेने अजूनही दिलेले नाहीत. तसेच पुढील वर्गात बसा. मात्र, रीतसर प्रवेश अर्ज भरून घेण्यात आलेले नाहीत. अशा पद्धतीने शाळा प्रशासन त्रास देत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी शाळेत गेलेल्या पालकांनी संतप्त होऊन फी काउंटर बंद पाडले. महापालिकेच्या शिक्षण सभापती विद्या गायकवाड, महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर आदी पालकांसोबत होत्या. पालकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. शाळा शिक्षण विभागाला जुमानत नाही, अशी तक्रार त्यांनी केली.
पालकांनी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली. देशमुख यांनी शाळा अशा पद्धतीने त्रास देत असेल तर शाळेविरोधात कारवाई करण्याचे महापालिकेला काय अधिकार आहेत हे तपासून निश्चितपणे शाळेवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.