नवी मुंबई : घणसोली रेल्वे स्थानकासमोर आणि डी-मार्ट मॉल समोर काही रिक्षाचालक एका रांगेत रिक्षा न लावता, थेट बस थांब्यासमोर उभ्या करून प्रवाशांच्या प्रतीक्षेत आडव्या-तिडव्या रिक्षा लावून असतात. यामुळे घणसोली रेल्वेस्टेशन आणि डी-मार्ट मॉल येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण होत आहे. याचा प्रवाशांना व वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.रेल्वेस्थानकापासून घणसोली गाव आणि कोपरखैरणेकडे जाणाऱ्या तसेच रबाळे स्टेशन ते घणसोली गावाकडे रिक्षाने जाणाºया प्रवाशांची संख्या दररोज शेकडोंच्या घरात आहे. आरटीओ व नवी मुंबई महापालिकेने अधिकृत शेअरिंग रिक्षा स्टँड उभारला आहे. मात्र, भाडे लवकर मिळावे, या उद्देशाने रिक्षांच्या रांगांमध्ये रिक्षा न लावता रिक्षाचालक थेट या रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे रेल्वेस्थानकातून येणारे प्रवासी भाडे प्रथम रिक्षाचालकांना मिळते. तीन प्रवासी संख्येची मर्यादा असताना, एका रिक्षात तीनपेक्षा जास्त प्रवासी भरून आरटीओच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. घणसोली आणि रबाळे परिसरातील रिक्षाचालक रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभ्या करत असल्यामुळे घणसोली रेल्वेस्टेशन (वूड बाजार फर्निचर मॉल), मिडलँड हॉटेल घणसोली गावात सरपंच दगडू चाहू पाटील चौक, गावदेवी हॉटेल परिसर, तसेच रबाळे रेल्वेस्टेशन जवळ पोलीस स्टेशन पार्किंग झोन परिसर, रबाळे रेल्वे भुयारी मार्गाजवळ डॉ. गवळी हॉस्पिटल, गोठीवलीतील विठ्ठल-रखुमाई मंदिर येथे वाहतूककोंडीमुळे अडथळा निर्माण होतो.
घणसोलीमध्ये रिक्षाचालकांची मनमानी; प्रवाशांची होते गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 1:51 AM