कळंबोली स्टील मार्केटच्या हस्तांतरणाचा वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 01:41 AM2018-08-23T01:41:55+5:302018-08-23T01:42:10+5:30
पायाभूत सुविधांचा बोजवरा; सिडको, बाजार समितीकडून टोलवा-टोलवी
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : आशिया खंडातील सर्वात मोठ्या स्टील मार्केटच्या हस्तांतरणाबाबत वाद सुरू झाला आहे. बाजार समितीकडे आवारवर्ग केल्याचा दावा सिडकोने केला आहे. मात्र, या संदर्भातील प्रक्रिया अद्यापि पूर्ण झाली नसल्याचे बाजार समितीकडून सांगितले जात आहे. त्यामुळे हस्तांतरणाच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या या घोळाचा फटका मार्केटमधील पायाभूत सुविधांना बसला आहे.
कळंबोली येथील ३०२ हेक्टर जमिनीवर स्टील मार्केट उभारण्यात आले. १२५, २५०, ४५०, ९०० चौ.मी. अशा वेगवेगळ्या आकाराचे १९६० भूखंड पाडण्यात आले आहेत. सिडकोने १९८० मध्ये हे भूखंड लीज करारावर व्यापाऱ्यांना दिले आहेत. भूखंड देऊन सिडकोने आपली जबाबदारी झटकली आहे. कारण या मार्केटमध्ये पायाभूत सुविधांचा वानवा आहे.
बाजारात आवारातील मुख्य रस्त्यांची देखभाल, दिवाबत्ती दुरुस्ती व देखभाल, रस्त्यालगत वृक्षारोपण करण्याची जबाबदारी सिडकोवर आहे. अंतर्गत कच्चे रस्ते, सर्व्हिस रोड, नाले, गटारे, सुरक्षा व्यवस्था, वृक्षलागवड आणि त्यांचे संवर्धन आदीची जबाबदारी बाजार समितीने पार पाडणे गरजेचे आहे. मात्र, दोन्ही प्रशासनाकडून आपापल्या जबाबदारीला बगल दिली जात आहे. विशेष म्हणजे, सिडको आणि बाजार समिती प्रशासन या संदर्भात एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे येथील पायाभूत सुविधांचा पुरता बोजवरा उडाला आहे.
स्टील मार्केटच्या विकास आराखड्यात लहान शौचालये-१२, विद्युत केंद्र-१५, सुरक्षा मनोरे-१०, पोलीस चौक्या-०२, वाहन थांबे-१६, पेट्रोल पंप-०१, वजन काटे-०६, एमटीएनएल केंद्र-०२, बगिचे-४१, व्यापारी संघटनांच्या सहकारी संस्थेसाठी भूखंड-०३ आदीचे नियोजन करण्यात आले होते; परंतु यापैकी किती सुविधांची पूर्तता करण्यात आली, हा संशोधनाचा विषय बनला आहे.
स्टील मार्केटमधील रस्ते आणि पायाभूत सुविधा निर्माण करून देण्याची जबाबदारी सिडकोची आहे. त्यांनी अंतर्गत रस्ते करून देणे क्र मप्राप्त होते. मात्र, प्राधिकरणाने जबाबदारी घेतली नाही. मार्केट परिसर आम्ही हस्तांतरित करून घेतलेला नाही.
- विकास रसाळ,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
स्टील मार्केट कमिटी
स्टील मार्के ट बाजार समितीकडे हस्तांतरित झाले आहे, त्यानुसार करारनामाही झाला आहे. त्यावर संबंधितांच्या सह्याही आहेत, त्यामुळे अंतर्गत रस्ते, पथदिव्यांसह इतर पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी बाजार समिती प्रशासनाची आहे.
- गिरीश रघुवंशी, कार्यकारी अभियंता,
सिडको, कळंबोली नोड