सिलिंडरमधून गॅस चोरणाऱ्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 01:17 AM2021-03-10T01:17:30+5:302021-03-10T01:17:41+5:30
एजन्सीचे कामगार : भररस्त्यात प्रकार सुरू असताना कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस चोरणाऱ्या तिघांना सानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. तिघेही गॅस एजन्सीचे डिलिव्हरी बॉय असून रात्रीच्या वेळी ते भररस्त्यात भरलेल्या सिलिंडरमधून रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस चोरी करायचे. अशा प्रकारे त्यांनी आजवर अनेक ग्राहक व शासनाची फसवणूक केल्याची शक्यता आहे.
नवी मुंबईत अनेक ठिकाणी आडोशाच्या ठिकाणी गॅस एजन्सीचे टेम्पो उभे असल्याचे पाहायला मिळते. त्या ठिकाणी गॅस चोरी होत असल्याच्या तक्रारी अनेकदा नागरिकांकडून पुढे आल्या आहेत. असाच प्रकार सानपाडा येथे सोमवारी रात्री उघडकीस आला आहे. पोलीस नाईक भाऊसाहेब होलगीर हे कामावरून घरी जात असताना सानपाडा सेक्टर ५ येथे रस्त्यालगत आडोशाच्या ठिकाणी त्यांना गॅस एजन्सीचा टेम्पो उभा असल्याचे दिसून आले. शिवाय गॅसची दुर्गंधी येत असल्याने त्यांनी टेम्पोमध्ये डोकावून पाहिले.
या वेळी तिथे गॅसची चोरी सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी तत्काळ वरिष्ठ निरीक्षक सुभाष निकम यांना कळविले असता, त्यांनी सहायक निरीक्षक नीलेश राजपूत यांचे पथक त्या ठिकाणी पाठवले.
या वेळी पोलिसांनी टेम्पोला घेराव घातला असता दोघांनी संधी साधून पळ काढला तर तिघे पोलिसांच्या हाती लागले. चौकशीत ते तिघेही गॅस एजन्सीचे कर्मचारी असल्याचे समोर आले.
मनोज सोनाराम बिष्णोई (२१), मनोज हनुमानराम बिष्णोई (२२) व रामस्वरूप बिष्णोई (२१) अशी त्यांची नावे आहेत. तर मांगीलाल बिष्णोई व मनफूल बिष्णोई अशी पळालेल्या दोघांची नावे आहेत.
स्फोट होण्याची होती शक्यता
nसानपाडा सेक्टर ५ येथे शाळेच्या समोरील रस्त्यावर त्यांनी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा टेम्पो थांबवला होता. त्यामधील भरलेल्या सिलिंडरमधून रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस चोरत होते.
nप्रत्येक सिलिंडरमधून काही प्रमाणात गॅसची चोरी करून भरलेला रिकामा सिलिंडर ते ग्राहकांना विकायचे. या प्रकारातून त्यांनी ग्राहक व शासन यांची फसवणूक केली आहे. त्यानुसार सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.
nदरम्यान, त्यांच्याकडून गॅसची चोरी होत असताना त्या ठिकाणी आग लागून स्फोट झाल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता होती. यानंतरही रहिवासी भागातच त्यांच्याकडून गॅस चोरीचे प्रकार सुरू होते.