लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : महापे परिसरात चोरी, घरफोडी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील ३ लाख ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यापैकी एकाने आईवर देखील चाकूने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
महापे परिसरात चोरी, घरफोडीच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामध्ये सक्रिय टोळ्यांकडून नशेत हे गुन्हे केले जात आहेत. त्यांच्याकडून परिसरात दहशत पसरवण्याचे देखील प्रकार घडत आहेत. अशा गुन्ह्यात सक्रिय टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी सहायक निरीक्षक राजेंद्र घेवडेकर, सोमनाथ भालेराव, रोहित राठोड, किरण घुगे, सुनील सकट, चेतन पाटील, राजेश उघाडे, मनोहर जाधव, किशोर घनवटे आदींचे पथक केले होते. त्यांनी महापे परिसरातून कौशल जाधव, मुकेश स्वामी, अजय कांबळे यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी, घरफोडीचे पाच गुन्हे उघड झाले असून त्यामधील ३ लाख ८० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. कौशल याच्यावर यापूर्वी त्याच्याच आईवर वार केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याशिवाय महापे परिसरात अमली पदार्थ पुरवणाऱ्यांसोबत त्यांचे संबंध असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
मोबाईल चोरालाही अटक
तुर्भे एमआयडीसी मधून जाणाऱ्या एका रिक्षातील महिलेचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्याची माहिती मिळताच गस्तीवर असलेल्या सहायक निरीक्षक घेवडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठलाग करून अजय कांबळे (२०) या मोबाईल चोराला अटक केली. तो तुर्भे नाका येथे राहणारा आहे.