गणेश नाईकांना त्वरित अटक करा! राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 10:48 AM2022-04-20T10:48:55+5:302022-04-20T10:50:16+5:30
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी त्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे.
नवी मुंबई : ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात एका महिलेने जीवे मारण्याची धमकी आणि लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर त्यांच्या विरोधात बेलापूर आणि नेरूळ पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी नाईक यांना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीने मंगळवारी, एपीएमसी परिमंडळ १ येथील पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी त्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. गणेश नाईक यांच्यावर दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे झाल्यानंतरही त्यांना अटक झाली नाही, त्यामुळे त्यांना त्वरित अटक करावी, अशी आंदोलनकर्त्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीची मागणी आहे. महिलेच्या तक्रारीनुसार तिला न्याय मिळावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील यांनी केली. यावेळी एनसीपीच्या प्रदेश महिला आघाडीच्या सरचिटणीस तथा पनवेल शहराच्या पक्ष निरीक्षक भावना घाणेकर, अशोक गावडे, अन्नू आंग्रे, गौरी आंग्रे, नवी मुंबई निरीक्षक निशा सोनावणे, पनवेल शहर अध्यक्षा नेहा पाटील, नवी मुंबई अध्यक्षा डॉ. प्राजक्ता मोंडकर, कार्याध्यक्षा सुनीता देशमुख आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील आणि भावना घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.