नवी मुंबई - खैरणे एमआयडीसीमध्ये अग्निशस्त्र विक्रीसाठी आलेल्या अकेला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी रात्री सापळा रचून त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तूल व दोन काडतुसे आढळून आली आहेत.
खैरणे एमआयडीसी परिसरातील एका बारच्या बाहेर अग्निशस्त्र विक्रीसाठी एकजण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे कक्ष एक चे वरिष्ठ निरीक्षक आबाशानबा पाटील, सहायक निरीक्षक गंगाधर देवडे, आर. तडवी, निलेश पाटील, सचिन बाराते, लक्ष्मण कोपरकर, विश्वास पवार, विशाल सावरकर आदींचे पथक करण्यात आले होते.
सोमवारी रात्री दहाच्या सुमारास बेला बारच्या बाहेर सापळा रचला होता. त्याठिकाणी संशयित एकजण आला असता त्याला ताब्यात घेऊन झडती घेण्यात आली. यामध्ये त्याच्याकडे एक जपान बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. त्याने हे अग्निशस्त्र विक्रीसाठी त्याठिकाणी आल्याची कबुली दिली. मात्र ते कोणाला विकले जाणार होते याचा उलगडा झाला नाही. याप्रकरणी त्याच्यावर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.