लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : फर्निचर व्यावसायिकाची हत्या करून पळालेल्या तरु णाला कोपरखैरणे पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. चौकशीत त्याने लुटीच्या उद्देशाने हत्या केल्याची कबुली दिली आहे. हत्येनंतर तो रेल्वेने राज्याबाहेर निघून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला पकडले.कोपरखैरणे सेक्टर ९ येथे फर्निचर व्यावसायिक रामहित शर्मा यांची मंगळवारी मध्यरात्री हत्या झाली होती. शर्मा हे दुकानात झोपले असताना त्याठिकाणचा कामगार एहैतशामुल हसन याने त्यांची हत्या करून पळ काढला होता. हसन हा अवघ्या दहा दिवसांपासून त्याठिकाणी काम करत होता. हत्येच्या घटनेनंतर त्याच्या शोधासाठी वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय तायडे यांचे पथक तयार करण्यात आले होते. तपासादरम्यान हसन यापूर्वी ज्याठिकाणी काम करायचा, तिथे केलेल्या चौकशीत नालासोपारा येथे त्याचे काही नातेवाईक राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने विलंब न लावता नालासोपारा परिसरात शोधमोहीम घेतली. या वेळी हसन रेल्वेने राज्याबाहेर जाण्याच्या तयारीत असून तो नालासोपारा रेल्वे स्थानकात येणार होता. यावरून पोलिसांनी रेल्वे स्थानकात सापळा रचला होता. परंतु पोलिसांना पाहताच त्याने पळ काढल्याने तपास पथकाने पाठलाग करून त्याला अटक केली. चौकशीत त्याने ११ हजार ८०० रु पये व मोबाइल चोरीसाठी रामहित याची हत्येची कबुली दिल्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. तर चोरलेल्या रकमेपैकी काही रक्कम त्याने घटनेच्या दिवशीच दुपारी बँकेतून गावी देखील पाठवली होती. त्याची पावती पोलिसांच्या हाती लागली आहे.
हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक
By admin | Published: May 06, 2017 6:23 AM