लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मुंबई महापालिकेचे बनावट नियुक्तिपत्र जप्त करण्यात आले आहे.
उलवे व ऐरोली येथील काही तरुणांना मुंबई महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावतो, असे सांगून १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाली होती. या प्रकरणी एनआरआय पोलीस तपास करत असताना, कोल्हापूर येथील टोळीची माहिती मिळाली होती. त्यानुसार, उपायुक्त सुरेश मेंगडे, सहायक आयुक्त भरत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी पोलीस निरीक्षक पृथ्वीराज, सहायक निरीक्षक समीर चासकर आदींचे पथक कोल्हापूर परिसरात तळ ठोकून होते. यावेळी जयसिंग पाटील (३८), स्नेहा सातपुते (३३), कृष्णात शेटे (५०), नामदेव पाटील (४०), संजय गाडेकर (५१) व भिकाजी भोसले (४५) हे पोलिसांच्या हाती लागले. सर्व जण कोल्हापूर परिसरात राहणारे असून, यापूर्वीही त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून मुंबई महापालिकेचे बनावट नियुक्तिपत्र जप्त केले.
गुन्हे दाखलसर्व आरोपी कोल्हापूर परिसरात राहणारे असून, यापूर्वीही त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर त्यांच्याकडून मुंबई महापालिकेचे बनावट नियुक्तिपत्र जप्त करण्यात आली असल्याचे उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. त्यांनी २५ ते ३० जणांची फसवणूक केली आहे.