दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक
By admin | Published: August 4, 2015 03:02 AM2015-08-04T03:02:49+5:302015-08-04T03:02:49+5:30
घणसोली येथील मॅकडोनाल्ड लुटण्यासाठी आलेल्या टोळीला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एका टेम्पोसह सुरा, कोयता, कटर जप्त करण्यात आले आहे.
नवी मुंबई : घणसोली येथील मॅकडोनाल्ड लुटण्यासाठी आलेल्या टोळीला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एका टेम्पोसह सुरा, कोयता, कटर जप्त करण्यात आले आहे.
घणसोली स्थानकालगतच्या मॅकडोनाल्ड हॉटेलवर दरोडा पडणार असल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल खताळ यांनी सापळा रचला होता. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मॅकडोनाल्ड परिसरात हा सापळा रचण्यात आला होता. या वेळी माहिती मिळालेल्या वर्णनाचा टेम्पो (एमएच २० सीटी ७८९४) त्या ठिकाणी येताच त्यांच्यावर झडप टाकली. या वेळी टेम्पोमध्ये चालकासह ७ जण लपून बसलेले आढळून आले. औरंगजेब खान (२१), सुनील पाल (२३), प्रेमचंद चव्हाण (१९), सिराज शेख (२०), मोहमद रशीद (२२), ममताज रंगरेज (२४) व हमीदराज खान (२२) अशी त्यांची नावे आहेत. झडतीमध्ये त्यांच्याकडे सुरा, कोयता, हॉकी, कटर व वायर असे दरोड्याचे साहित्य आढळून आले. मॅकडोनाल्डवर दरोडा टाकण्यासाठी ते आल्याची कबुलीही त्यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार या सातही जणांना अटक करून त्यांच्याविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते सर्व जण वडाळ्याचे असून, त्यांच्या इतर गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे सहायक निरीक्षक खताळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)