केटामाइन पावडरसह हेरॉइन विकणाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 11:53 PM2019-11-14T23:53:03+5:302019-11-14T23:53:06+5:30
शहरात अमली पदार्थांची विक्री करणा-या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
नवी मुंबई : शहरात अमली पदार्थांची विक्री करणा-या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये दोघा सराईत गुन्हेगारांचा समावेश असून त्यांच्याकडून केटामाइन पावडर, हेरॉइन तसेच गांजा असे अमली पदार्थ जप्त केल. त्याची किंमत २७ लाख रुपये असून महाविद्यालय परिसरात त्यांच्याकडून पदार्थांची विक्री केली जात होती.
नवी मुंबईत अमली पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांकडून कारवार्इंचा धडाका सुरू आहे. मागील तीन दिवसांत कोपरखैरणेतून चौघांना अटक केली असून त्यामध्ये पुरवठा करणाºयाचही समावेश आहे. परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जी. डी. देवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. कादर तुकू शेख (२२), असे गुन्हेगाराचे नाव असून तो जुहूगावचा राहणारा आहे. तीन दिवसांपूर्वी कोपरखैरणे रेल्वेस्थानकाच्या पार्किंगमधून शंकर निकम याला अमली पदार्थाची नशा करताना पकडण्यात आले होते. त्याच्या माहितीवरून टोनी वर्मा व पंकज वर्मा या भावांना दुसºया दिवशी अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत कादर याची माहिती समोर आल्यानंतर गुरुवारी कोपरखैरणेतील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या आवारातून त्याला अटक करण्यात आली. झडतीत त्याच्याकडे ११.४० ग्रॅम हेरॉइन व दुचाकीच्या सिटखाली एक किलो ७० ग्रॅम गांजा आढळून आला.
त्याचप्रमाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी पनवेलमध्ये कोळखे गावातून संभाजी अर्जुन सोनवणे (३०) याला अटक केली आहे. तो खालापूरचा राहणारा आहे. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांना याबाबत माहिती मिळाली होती. यानुसार उपआयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोळखे गावात सापळा रचण्यात आला. या वेळी संभाजी संशयास्पदरित्या वावरताना आढळला. झडतीत त्याच्याकडे ६०० ग्रॅम केटामाइन पावडर आढळून आली. बाजारभावानुसार त्याची किंमत २६ लाख रुपये आहे. ही पावडर घेऊन तो परिसरात विक्रीसाठी आला होता. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.