एटीएममध्ये अडकणारे पैसे चोरणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 12:47 AM2020-03-03T00:47:29+5:302020-03-03T00:47:35+5:30
एटीएम मशीनमध्ये ग्राहकांचे अडकलेले पैसे चोरणा-या एकाला त्याच्या साथीदारासह पोलिसांनी अटक केली आहे.
नवी मुंबई : एटीएम मशीनमध्ये ग्राहकांचे अडकलेले पैसे चोरणा-या एकाला त्याच्या साथीदारासह पोलिसांनी अटक केली आहे. तो अॅक्सिस बँकेने एटीएम देखभालीसाठी नेमलेल्या कंपनीचा कर्मचारी आहे. ग्राहकांचे मशीनमध्ये पैसे अडकल्याचे समजताच तो बनावट चावीने मशीन उघडून पैशांची चोरी करायचा.
सुयोग धिवार व जॉन्सन शेट्टी अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. सुयोग हा हिटाची पेमेंट सर्व्हिसेस कंपनीचा मॅनेजर असून ही कंपनी अॅक्सिस बँकेच्या एटीम मशीनची देखभाल दुरुस्ती बघते. त्यामुळे मशीनमधील बिघाडामुळे एखाद्या ग्राहकाचे पैसे मशीनमध्येच अर्धवट अडकल्यास त्याची माहिती सुयोग याला मोबाइलवर मिळायची. हे पैसे चोरण्यासाठी त्याने एटीएम मशीनच्या बनावट चावी बनवून ठेवल्या होत्या. त्याद्वारे साथीदार जॉन्सन शेट्टी याच्या मदतीने तो एटीएम मशीनमधील पैशांची चोरी करायचा. अशा प्रकारे त्याने ७० हजार रुपयांहून अधिक रकमेची चोरी केल्याचे समोर आले आहे.
एटीएममध्ये पैसे अडकल्याची बाब अनेकदा नागरिकांच्या निदर्शनास येत नसे. त्याचा फायदा घेऊन मोबाइलवर संबंधित एटीएममध्ये पैसे अडकल्याचा मॅसेज येताच बनावट चावीने ते मशीन उघडून अडकलेल्या पैशांची चोरी केली जायची. अशाच प्रकारे त्यांनी सानपाडा परिसरातील एका एटीएममधून पैशाची चोरी केली होती. परंतु घाईमध्ये त्यांच्याकडून मशीनचा दरवाजा उघडा राहिला. यासंबंधीची तक्रार सानपाडा पोलिसांकडे दाखल झाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक विकास रामुगडे यांनी पोलीस निरीक्षक देशमुख, सहायक निरीक्षक केशव दिंडे, सहायक उपनिरीक्षक काशिनाथ राऊळ, सुमंत बांगर, गणपत पवार, गुरुनाथ भुंडेरे, श्रीकांत नार्वेकर, अभय काकड यांचे पथक तयार केले होते. त्यांनी एटीएममधील सीसीटीव्ही व त्याच वेळी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. या वेळी एटीएममधून पैसे काढणारी व्यक्ती पैसे काढल्यानंतर जुईनगर येथील बारमध्ये गेल्याचे दिसून आले.
त्यानुसार पोलिसांनी बारमध्ये बिल भरणा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या कार्डची माहिती तपासली. या वेळी सुयोग धिवार व त्याचा सहकारी जॉन्सन शेट्टी यांची माहिती समोर आली. तसेच हे दोघेही नियमित त्या परिसरात येत असल्याचेही समजताच त्यांना सानपाडा परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी मागील काही दिवसात सुमारे ७० हजार रुपये एटीएममधून चोरल्याची कबुली दिली. त्यापैकी ४३ हजार ५०० रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.
>मोबाइलवर संबंधित एटीएममध्ये पैसे अडकल्याचा मॅसेज येताच बनावट चावीने ते मशीन उघडून अडकलेल्या पैशांची चोरी केली जायची. अशाच प्रकारे त्यांनी सानपाडा परिसरातील एटीएममधून पैशाची चोरी केली होती.