नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये शनिवारी ३९७ ट्रक आणि टेम्पो येत त्यातून तब्बल ४० हजारांपेक्षा जास्त हापूसच्या पेट्यांची आवक झाली. रमजान सुरू झाल्यामुळे कलिंगड व टरबूजचीही मागणी वाढली आहे.बाजार समितीमधील पाचही मार्केटमध्ये व्यवहार सुरळीत सुरू आहेत. शनिवारी सर्व मार्केटमध्ये एकूण ११३० ट्रक आणि टेम्पोंमधून कृषिमाल विक्रीसाठी आला. अक्षय्यतृतीया असल्याने ग्राहकांकडून आंब्याला मागणी वाढली आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तब्बल ४० हजारांपेक्षा जास्त पेट्या भरून आंबा विक्रीसाठी आला आहे. घाऊक बाजारात हापूस आंबा २५० ते ८०० रुपये डझन दराने तर किरकोळ बाजारात आंबा ३५० ते ९०० रुपये दराने विकला जात आहे. दक्षिणेकडील राज्यातूनही आंबा विक्रीसाठी येत आहे.रमजान सुरू झाल्यामुळे कलिंगड आणि टरबूजलाही पसंती असून शनिवारी ५० ट्रक कलिंगड मार्केटमध्ये आले. कलिंगड व टरबूजसाठी एसटी महामंडळाच्या भूखंडावर तात्पुरते मार्केट सुरू करण्यात आले आहे.>आंबा पिकविण्यासाठीची औषधे ताब्यातफळ मार्केटमध्ये आंबा पिकविण्यासाठी त्यावर स्प्रेद्वारे इथेल टाकले जाते. शुक्रवारी सायंकाळी हे स्प्रे जप्त करण्यात आले होते. शनिवारी अन्न आणि औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी मार्केटला भेट दिली. मात्र काहीही आक्षेपार्ह नसल्याचे लक्षात आल्यामुळे सर्व साहित्य पुन्हा व्यापाऱ्यांना देण्यात आले.
एपीएमसीत हापूसच्या ४० हजार पेट्यांची आवक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 2:21 AM