पावसामुळे फ्लेमिंगोचे आगमन लांबणीवर, डिसेंबरमध्ये किलबिलाट वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 01:55 AM2019-11-24T01:55:55+5:302019-11-24T01:58:43+5:30
पावसाचा कालावधी वाढल्यामुळे यावर्षी फ्लेमिंगोचे आगमण लांबणीवर पडले होते. सद्यस्थितीमध्ये पक्षांचे आगमन सुरू झाले असून डिसेंबरध्ये खाडीमध्ये हजारो फ्लेमिंगोचे आगमन होणार आहे.
नवी मुंबई : पावसाचा कालावधी वाढल्यामुळे यावर्षी फ्लेमिंगोचे आगमण लांबणीवर पडले होते. सद्यस्थितीमध्ये पक्षांचे आगमन सुरू झाले असून डिसेंबरध्ये खाडीमध्ये हजारो फ्लेमिंगोचे आगमन होणार आहे. पक्षीनिरीक्षकांसाठी वनविभागाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारे फ्लेमिंगो पावसाळ्यानंतर भारतात यायचे. काही वर्षांपासून त्यांनी परतीचा मार्ग बंद करून भारतामध्येच वास्तव्य सुरू केले. पावसाळ्यामध्ये कच्छ परिसरामध्ये त्यांचे वास्तव्य असते. पावसाळा संपला की,मुंबई, नवी मुंबईमधील खाडीकिनारी वास्तव्यास येतात. प्रत्येक वर्षी नोव्हेंबरच्या सुरवातीलाच हजारो पक्षी ऐरोली, वाशी व करावे परिसरातील खाडीमध्ये व उरण परिसरात येतात. पक्षी निरीक्षकांसाठी मुंबई, उपनगर व राज्यभरातून पक्षीनिरीक्षक या परिसरामध्ये येतात. करावेमधील टी. एस. चाणक्य च्या मागील बाजूला असलेल्या खाडीमध्ये पक्षांचे थवे पहाटे व सायंकाळी पहावयास मिळायचे. या वर्षी पाऊस आॅक्टोबरपर्यंत सुरू होता. यामुळे पक्षांचे आगमन लांबवणीवर पडले आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पक्षांचे आगमन सुरू झाले आहे. डिसेंबरमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे हजारो पक्षांचा किलबिलाट खाडीमध्ये सुरू राहण्याची शक्यता आहे. करावे परिसरामध्ये पक्षीप्रेमी सकाळी व सायंकाळी हजेरी लावू लागले आहेत. परंतु अद्याप पुरेशा प्रमाणात पक्षी पहावयास मिळत नसल्याने अनेकांना निराश होवू परत जावे लागत आहे.
करावेमध्ये सुविधा नाहीत
नवी मुंबईमध्ये ऐरोली ते वाशी दरम्यान फ्लेमिंगो अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. या परिसरामध्ये पक्षीनिरीक्षणासाठी बोटीचीही सोय आहे, परंतु करावे व एनआरआय परिसरामध्येही मोठ्या प्रमाणात पक्षी येत असतात. या परिसरामध्ये पक्षीनिरीक्षणासाठी सुविधा असावी व समाजकंटक पक्ष्यांची शिकार करणार नाहीत यासाठीही लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत पक्षीनिरीक्षक व्यक्त करत आहेत.
पक्षांच्या १६८ पेक्षा जास्त प्रजाती
नवी मुंबईमध्ये फक्त फ्लेमिंगोच नाही, तर इतरही पक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण अहवालामध्ये आयुक्तालय क्षेत्रामध्ये १६८ पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. खाडी व किनाºयावरही विविध प्रकारचे पक्षी पाहावयास मिळतात.
खाडीमध्ये फ्लेमिंगोंचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांना पक्षीनिरीक्षण करता यावे, यासाठी सागरी सफरीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय ऐरोलीमधील जैवविविधता केंद्रामध्येही फ्लेमिंगोसह जैवविविधतेची माहिती उपलब्ध करून दिली आहे.
- एन जी कोकरे, वनक्षेत्रपाल, ठाणे खाडी फ्लेमिंगो विभाग