नवी मुंबईतील कृत्रिम तलाव बनले स्विमिंग पूल
By योगेश पिंगळे | Published: September 26, 2023 06:56 PM2023-09-26T18:56:34+5:302023-09-26T18:56:53+5:30
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा नागरिकांचा आरोप
नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव शहराच्या नावलौकिकाला साजेसा पर्यावरणपूरक पध्दतीने साजरा व्हावा यासाठी महापालिका प्रशासनाने शहरात सुमारे १४१ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली आहे. विसर्जनानंतर या तलावांवर पालिकेचे कर्मचारी तैनात नसल्यामुळे लहान मुले त्याचा स्विमिंग म्हणून वापर करू लागले असून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नवी मुंबई शहरात २२ नैसर्गिक विसर्जन तलाव असून तलावांवर होणारी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी तसेच शहराच्या नावलौकिकाला साजेसा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुमारे शहरात यंदा १४१ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली आहे. मगरीकांनी देखील या तलावांना प्रसन्नती दिली असून गतवर्षीपेक्षा यंदा अधिक दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन या तलावांमध्ये झाले आहे.
विसर्जनासाठी कृत्रिम तलावांमध्ये पाणी भरण्यात आल्याने परिसरातील बच्चे कंपनीने या तलावांचा स्विमिंग पूल म्हणून वापर सुरु केला आहे. या तलावांजवळ सुरक्षा रक्षक नेमणे आवश्यक असताना त्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले असून एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विसर्जनानंतर सर्व कृत्रिम तलाव रिकामे करावे तसेच पाणी भरल्यावर तलावांजवळ सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.