लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेने विभागनिहाय कृत्रिम तलाव तयार केले आहेत. नागरिकांच्या माहितीसाठी या तलावांची यादी सोशल मीडियावर तसेच विभागनिहाय बॅनरद्वारे देण्यात आली आहे. त्यामध्ये केवळ दिघा विभागातील बॅनरवर माजी नगरसेवकांच्या नावाने तलावांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राजकारण्यांच्या प्रचारासाठी महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे का ? अशी टिका आपने केली आहे.
महापालिकेकडून प्रतिवर्षी गणेशोत्सव काळात छोट्या गणेशमूर्तीसाठी विभागनिहाय कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाते. त्यानुसार यंदाही ठिकठिकाणी कृत्रिम तलाव तयार करून त्यांची माहिती विभागनिहाय बॅनरद्वारे व सोशल मीडियावर देण्यात आली आहे. त्यामध्ये तलावांच्या ठिकाणांचा व सेक्टरचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र केवळ दिघा विभागात कृत्रिम तलावांना माजी नगरसेवकांची नावे देण्यात आली आहेत. तसे बॅनर देखील दिघा विभागात मागील काही दिवसांपासून हे बॅनर झळकत आहेत. या बॅनरच्या माध्यमातून महापालिका माजी नगरसेवकांचा प्रचार करत आहे का ? असा प्रश्न आम आदमी पार्टीचे युवा अध्यक्ष संतोष केदारे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान बॅनरवर राजकीय व्यक्तींची नावे छापून येण्यामागे प्रिंटिंगची चूक असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगून तातडीने बॅनर बदलण्याचे सूचित केले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र गणेशचतुर्थीच्या अगोदर पासून हे बॅनर झळकत असतानाही विभाग अधिकारी व इतर अधिकाऱ्यांच्या नजरेत हि प्रिंटिंग चूक निदर्शनास आली नाही का ? कि जाणीवपूर्वक चूक केली गेली असाही प्रश्न केदारे यांनी उपस्थित केला आहे.