नवी मुंबई : शासनाच्या बालनाट्य स्पर्धेला कलाकार घडविणाºया कार्यशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोकण विभागीय स्पर्धेमध्ये तब्बल ६३ नाटके सादर केली जाणार असून ६०० पेक्षा जास्त कलाकार सहभागी झाले आहेत. स्पर्धेतून चांगले बालकलाकार घडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.जानेवारी महिन्यात शाळेमध्ये वार्षिक स्रेहसंम्मेलनाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना चालना देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. विद्यार्थीही मनापासून या महोत्सवामध्ये सहभागी होवून त्यांच्यामधील कलागुण सादर करत असतात. परंतु सर्व कलागुण वार्षिक महोत्सवापुरतेच मर्यादित रहात असतात. विद्यार्थ्यांना शाळेबाहेर व्यासपीठ उपलब्ध होत नाही. यामुळेच राज्य शासनाच्यावतीने बालनाट्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. राज्यातील सहा झोनमध्ये ८ जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू आहे. मुंबई, पालघर, ठाणे व रायगड जिल्ह्यातील विभागीय स्पर्धा वाशीतील साहित्य मंदिर सभागृहात सुरू आहे. चार जिल्ह्यातून तब्बल ६३ टीमने स्पर्धेत सहभाग घेतला आहे. १८ जानेवारीपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे. या स्पर्धेत यशस्वी होणाºया नाटकांची अंतिम स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.नाट्य स्पर्धेच्या दुसºया दिवशी नेरूळमधील तेरणा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मला उत्तर हवं हे सुनील मळेकर यांनी लिहिलेले नाटक सादर केले. जाती, धर्माच्या नावाखाली समाजामध्ये निर्माण होत असलेली दुही व महिलांवर होणारे अत्याचार हा विषय असलेल्या नाटकाने उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय वाचवाल तर वाचाल, इथं उजाडत नाही, एक हिरवी गोष्ट, गुरू साक्षात परब्रम्ह, आकार व घरटं या नाटकांचाही सहभाग होता. सर्वच नाटके दर्जेदारपणे सादर केली जात असून विद्यार्थी मनापासून त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका सादर करत आहेत. या नाट्य स्पर्धेतून भविष्यात चांगले कलाकार घडतील असा विश्वास स्पर्धा पाहण्यासाठी आलेले शिक्षक, पालक व मान्यवरांनी व्यक्त केला आहे. तेरणा शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर दिग्दर्शक आनंद पिल्लई, मुख्याध्यापिका शिजा एल्बर्ट, संतोषकुमार खांडगे, गणेश महाकाळ, निवृत्ती मोरे, स्रेहल परदेशी उपस्थित होत्या.शाळेत वर्षभर विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये प्रथमच तेरणा शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.- डॉ. राजीव सिंग, तेरणाराज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १८ जानेवारीपर्यंत स्पर्धा होणार असून यामधील विजेत्या नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे.- राकेश तळगावकर,समन्वयक, राज्य नाट्य स्पर्धा
बालनाट्य स्पर्धेला कलाकारांच्या कार्यशाळेचे स्वरूप; कोकण विभागातून ६०० बालकलाकारांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 3:13 AM