अरुणा पाठ्यपुस्तकात हवी
By admin | Published: May 20, 2015 12:34 AM2015-05-20T00:34:46+5:302015-05-20T00:34:46+5:30
अत्याचारातून आजारपण, त्यांची मृत्यूशी झुंज, इच्छामरणाबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा सर्व घटनाक्रम आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे.
नवी मागणी : तज्ज्ञांचाही पाठिंबा, प्रयत्नही सुरू
मुंबई : चार दशके अंथरुणाला खिळलेल्या अरुणा शानबाग यांनी अखेर काल जगाचा निरोप घेतला. त्यांच्यावर झालेल्या अत्याचारातून आजारपण, त्यांची मृत्यूशी झुंज, इच्छामरणाबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा सर्व घटनाक्रम आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. त्यांनी दिलेली झुंज व केईएमच्या परिचारिकांचे नि:स्वार्थ सेवा व्रत येणाऱ्या पिढीला कळाले तर ते नक्कीच एक आदर्श जीवन घडवायला पोषक ठरेल. याच भावनेतून अरुणा शानबाग यांचा एक धडा पाठ्यपुस्तकात असावा, अशी मागणी होत आहे. इच्छामरणाचा महत्त्वाचा विषय अरुणा यांच्यानिमित्तानेच पुढे आला, सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. त्यामुळे या घटनेचे गांभीर्यही येणाऱ्या पिढीला कळणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊनच अरुणाचा धडा पाठ्यपुस्तकात यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले असून याला तज्ज्ञांनीही पाठिंबा दिला आहे.
सर्वांसाठीच आदर्श ठरेल
अरुणाची नि:स्वार्थ सेवा करून केईएम रुग्णालयातील परिचारिकांनी रुग्णसेवेचा घालून दिलेला आदर्श समाजासमोर यायलाच हवा. केवळ शालेय विद्यार्थ्यांनाच नव्हे तर समाजातल्या सर्व स्तरांतील व्यक्तींसाठी हा मानवतेचा आदर्श ठरेल. अरुणाचा संघर्ष, परिचारिकांची रुग्णसेवा व्रत आणि एकूणच घटनेचा संपूर्ण अभ्यास करून हा धडा अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा.
- डॉ. अविनाश सुपे,
अधिष्ठाता, के.ई.एम. रुग्णालय
विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल
रक्ताच्या नात्यांचेही मूल्य हरवत चालले आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयातील परिचारिकांनी ज्या भावनेने स्वत:ला सेवेत वाहून घेणे ही खरी माणुसकीची व्याख्या आहे. अरुणाच्या या लढ्याचा आणि केईएमच्या सेवाव्रताचा अभ्यासक्रमात समावेश केल्यास शालेय विद्यार्थ्यांसाठी तो नक्की प्रेरणादायी ठरेल. त्यामुळे शिक्षणक्षेत्रातील संबंधित विभागांनी आणि तज्ज्ञांनी त्वरित याबाबत विचार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घ्यावा. ‘लोकमत’चा हा निर्णय स्वागतार्ह आहे.
- डॉ. विजया वाड, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
बोथट समाजापुढे
हा आदर्श यायलाच हवा
बऱ्याचदा सरकारी रुग्णालयातील सेवेबाबत शंका उपस्थित केली जाते. सरकारी रुग्णालयांमध्ये मिळणाऱ्या उपचारांबाबत आजमितीसही सामान्यांच्या मनात शंका निर्माण होतात. अशावेळी गेली ४२ वर्ष केईएम रुग्णालयाने जोपासलेला हा सेवेचा आदर्श बोथट झालेल्या समाजासमोर आला पाहिजे. त्यामुळे शासनाने पुढाकार घेऊन अभ्यासक्रमात अरुणाविषयी धडा समाविष्ट करावा.
- स्वाती पाटील, सामाजिक कार्यकर्त्या
ठाण्याच्या परिचर्या संस्थेला अरुणाचे नाव
राज्य सरकारच्या ठाणे येथील परिचर्या प्रशिक्षण संस्थेला दिवंगत अरुणा शानबाग यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. ४८ वर्षे जुने असलेल्या या संस्थेत जनरल नर्सिंगच्या अभ्यासक्रमाच्या ८० तर आॅक्झिलरी नर्स मिडवाइफच्या ४० जागा आहेत.