घरांच्या सोडतीसाठी सिडकोकडून ‘तारीख पे तारीख’; अर्जदारांत संभ्रम; तळोजा, द्रोणागिरी नोडमधील ३,३२२ सदनिका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 06:26 AM2024-05-02T06:26:03+5:302024-05-02T06:28:10+5:30
गेल्या पाच वर्षांत सिडकोने विविध घटकांसाठी विविध गृहयोजनांच्या माध्यमातून जवळपास तीस हजार घरांची योजना जाहीर करून त्यांची संगणकीय सोडत काढली आहे.
नवी मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर सिडकोने तळोजा आणि द्रोणागिरी नोडमधील ३३२२ घरांची योजना जाहीर केली होती. या योजनेची संगणकीय सोडत १९ एप्रिल रोजी नियोजित केली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने ती पुढे ढकलण्यात आली. कोणतेही अधिकृत प्रसिद्धीपत्रक न काढता थेट संकेतस्थळावर याबाबतची सूचना दिली आहे. यातही सोडतीच्या दोन तारखा बदलल्याने अर्जदारांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या पाच वर्षांत सिडकोने विविध घटकांसाठी विविध गृहयोजनांच्या माध्यमातून जवळपास तीस हजार घरांची योजना जाहीर करून त्यांची संगणकीय सोडत काढली आहे. मात्र, विविध कारणांमुळे हजारो घरे विक्रीविना पडून आहेत. विशेष म्हणजे, यातील सर्वाधिक घरे तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये आहेत. त्यांपैकी ३३२२ घरांची योजना प्रजासत्ताक दिनी जाहीर केली आहे. या घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १६ एप्रिल रोजी संपली आहे. त्यामुळे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार १९ एप्रिलला संगणकीय सोडत काढणे अपेक्षित होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे १९ एप्रिलची पूर्वनियोजित सोडत पुढे ढकलली. विशेष म्हणजे याबाबत सिडकोने कोणतेही अधिकृत वृत्त जारी केले नाही. त्याऐवजी ८ मे रोजी संगणकीय सोडत काढली जाईल, अशी माहिती संकेतस्थळावर दिली.
जूनच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता संपते, मग मध्येच ८ जूनचा मुहूर्त कसा काढला, असा सवाल अर्जदारांकडून उपस्थित केला जात आहे. अर्जदारांत निर्माण झालेला संभ्रम लक्षात घेऊन घरांच्या संगणकीय सोडतीसाठी ८ मेऐवजी ७ जूनचा मुहूर्त निश्चित केला आहे. सोडतीसाठी सिडकोच्या संबंधित विभागाकडून सुरू असलेल्या तारखेच्या घोळामुळे अर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उपलब्ध घरांचा तपशील
विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या ३३२२ घरांपैकी द्रोणागिरी नोडमध्ये ६१, तर तळोजामध्ये २५१, अशा एकूणच ३१२ सदनिका पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत.
द्रोणागिरीतील ३७४ व तळोजा नोडमधील २,६३६ अशा एकूण ३,०१० सदनिका या सर्वसाधारण घटकांसाठी उपलब्ध आहेत. यांपैकी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या ३१२ सदनिकांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
संबंधित विभागाच्या विविध प्रयत्नानंतरही सर्वसाधारण घटकांसाठी असलेल्या ३०१० सदनिकांना अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या घरांची विक्री करण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर उभे ठाकले आहे.