बायोमॅट्रिक हजेरीप्रमाणेच महानगरपालिका कर्मचाऱ्यांना वेतन, रजा मंजूर नसल्यास वेतन नाही
By नामदेव मोरे | Published: June 9, 2023 05:42 PM2023-06-09T17:42:25+5:302023-06-09T17:42:47+5:30
कर्मचाऱ्यांचे वेतन बायोमॅट्रिक हजेरीप्रमाणेच काढले जाणार असून उशिरा येणाऱ्यांच्या व सुट्टी मंजूर नसणारांचे वेतनात कपात केली जाणार आहे.
नवी मुंबई : महानगरपालिकेमध्ये उशिरा येऊन लवकर घरी जाणारे व रजा मंजूर नसतानाही सुट्टी घेणारांना दणका बसणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन बायोमॅट्रिक हजेरीप्रमाणेच काढले जाणार असून उशिरा येणाऱ्यांच्या व सुट्टी मंजूर नसणारांचे वेतनात कपात केली जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमधील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा राजेशाही थाट सुरू आहे. वारंवार सूचना देऊनही अनेकजण एक ते दीड तास उशिरा येतात. दुपारी जेवणाच्या सुट्टीवर शतपावली करण्यात एक तास घालवतात. सायंकाळी लवकर घरी जातात. प्रसारमाध्यमांनी उशिरा येणारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. सामाजिक कार्यकर्ते सुधीर दाणी यांनीही वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता.
महानगरपालिका आयुक्त व प्रशासन उपायुक्तांनीही कर्मचाऱ्यांना वेळेत कामावर हजर होण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु यानंतरही अनेकजण बेशिस्त वर्तन करत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आता यापुढे अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन बायोमॅट्रिक हजेरीप्रमाणे काढण्याचे निश्चित केले आहे.
विभाग प्रमुखांनी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील उपस्थितीवर नियंत्रण ठेवावे. विनापरवानगी व रजा मंजुर नसताना गैरहजर राहणारे कर्मचारी यांचे वेतन काढू नये. प्रत्येक महिन्याच्या वेतन देयकासोबत विभागप्रमुखांनी हजेरी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी यांना बायोमॅट्रिक हजेरी क्रमप्राप्त आहे. बायोमॅट्रिक मशीन चालू स्थितीमध्ये ठेवण्याची जबाबदारी संगणक विभागाची असल्याचे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.
अहवाल सादर करण्याचे आदेश
सर्व कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रिक हजेरीचा अहवाल महिन्याच्या पहिल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत सादर करण्यात यावा. या आदेशाची जून महिन्याच्या वेतन देयकापासून अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचनाही आयुक्तांनी पत्रकाद्वारे दिल्या आहेत.