प्रलंबित मागण्यांसाठी आशा वर्कर्सचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 02:45 AM2019-12-28T02:45:00+5:302019-12-28T02:45:09+5:30
महापालिका मुख्यालयावर मोर्चा : तत्काळ प्रश्न सोडवण्याची मागणी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचे काम करणाऱ्या आशांना देण्यात येणारे मानधन, गणवेश भत्ता, ओळखपत्र, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा आदी मागण्यांसाठी नवी मुंबईतील आशा वर्कर्सने शुक्र वारी महापालिकेवर मोर्चा काढला होता. या वेळी मोर्चेकरी महिलांनी सावित्रीबाई फुलेंचा मुखवटा घातला होता.
नवी मुंबई महानगरपालिकेत २४८ आशा वर्कर्स एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी या मार्फत राष्ट्रीय शहरी अभियानांतर्गत केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सूचनेनुसार काम करीत आहेत. शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे त्यांना मानधन देणे गरजेचे आहे; परंतु नवी मुंबई महापालिकेतील कार्यरत आशांना दिले जाणारे मानधन आणि शासनाने निश्चित केलेले मानधन यात तफावत असल्याने आशा वर्कर्सला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. गणवेश भत्ता दुप्पट मिळावा. शासनाने ठरवून दिलेल्या कामाच्या व्यतिरिक्त करण्यात येणाºया कामासाठी अतिरिक्त मानधन मिळावे, दर सहा महिन्याला नियुक्तीपत्र देण्याची प्रथा बंद करावी, ओळखपत्र मिळावे. दर महिन्याच्या ५ तारखेला वेतन मिळावे, दर महिना मोबाइल खर्चासाठी ३०० रु पये मिळावेत, आशा कर्मचाºयांना शासकीय कर्मचाºयाचा दर्जा मिळावा इत्यादी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाच्या शिष्टमंडळाने उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोनावणे, वैद्यकीय अधीक्षक रत्नप्रभा चव्हाण यांच्याशी चर्चा केली. आशा वर्कर्सच्या महानगरपालिका स्तरावरच्या मागण्या सोडवण्यात येतील व शासनाच्या अधीन असलेल्या मागण्यांसाठी शासनाकडे मार्गदर्शक सूचनांसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय आरोग्य अधिकारी सोनावणे यांनी दिले असल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली. सदर मोर्चामध्ये शेकडो आशा वर्कर्स सहभागी झाल्या होत्या. आश्वासनांची अंमलबजावणी तत्काळ करण्याची मागणी केली.