वैभव गायकर. पनवेलपनवेलमधील ऐतिहासिक अशोक बागेकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असून अशोक बाग ही सध्या मोकाट गुरांचे आश्रयस्थान ठरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पन्नास वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली ही अशोक बाग पेशवेकालीन आहे. या ऐतिहासिक बागेत नागपंचमीला पनवेल शहरासह आजूबाजूचे नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या अशोक बागेची दुरवस्था झाली असून याठिकाणचा बगिचा देखील उद्ध्वस्त झाला आहे. याठिकाणी वाढणारी अनधिकृत झोपडपट्टी, वेळी-अवेळी मद्यपींचे धिंगाणे, जुगार खेळणाऱ्यांचे वाढते वरदहस्त या नित्यांच्या समस्या बनल्या आहेत. विशेष म्हणजे या बागेत गुरांना देखील बांधले असल्यामुळे अशोक बाग गुरांचा गोठा बनत असल्याचे दिसून येत आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या अशोक बागेच्या या दुरवस्थेबाबत पनवेलमधील नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. नागपंचमीनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक याठिकाणी येऊन नागाच्या मूर्तीची पूजा करत असतात, त्या मूर्तीचे पावित्र्य देखील याठिकाणी राखले जात नाही. बागेतील संरक्षक भिंत देखील तुटलेली आहे. नगरपरिषदेमार्फत गेट देखील याठिकाणी उभारलेले नाही. अंधारात विजेची व्यवस्था नाही. रात्रभर या परिसरात मोकाट डुक्कर देखील फिरकत असतात त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण नाही. नगरपरिषदेमार्फत याठिकाणी रखवालदार देखील नेमला नसल्याने मद्यपींचे फावले असल्याने त्यांनी या ठिकाणाला दारूचा अड्डा बनवला आहे. अशा समस्यांचा खच बागेत पडलेला दिसून येत आहे. अशोक बागेच्या झालेल्या दुरवस्थेबाबत पनवेल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही अशोक बागेचे गार्डन विकसित करणार आहोत. तसेच याठिकाणाहून रस्ता गेलेला आहे त्याबाबत योग्य उपाययोजना राबवून अशोक बाग योग्यरीत्या विकसित करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अशोक बागेचा बनला गोठा
By admin | Published: May 11, 2015 1:53 AM