लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : एपीआय अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली तेव्हा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे राजू पाटील हे कुरुंदकरच्या भाईंदरच्या गोल्डन नेस्ट येथील फ्लॅटवर असल्याचे मोबाईल जीपीआयएसवरून सिद्ध झाले आहे. रात्री १२ वाजून १६ मिनिटांपासून ते १२ वाजून २८ पर्यंत म्हणजे सुमारे १२ मिनिटे पाटील वापरत असलेल्या मोबाईलचे लोकेशन याठिकाणी असल्याचे व्हाेडाफोनचे नोडल अधिकारी चांगदेव गोडसे यांच्या उलटतपासणीतून स्पष्ट झाले आहे.पाटील याच्या वकिलांनी मात्र तो मोबाईल आमचा नव्हेच, असा युक्तिवाद केला. मात्र, विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला.
मुख्य आरोपी कुरुंदकरचे वकील भानुशाली यांनी क्रासचीफमध्ये एक्झिबिट पडलेल्या पेपरलाच दोन-तीन वेळेस क्राॅस करण्याचा प्रयत्न केला. त्याला विशेष सरकारी वकील घरत यांनी पुन्हा जोरदार आक्षेप नोंदवत जर एखादा पेपर न्यायालयात दाखल केला, तो रेकॉर्डवर आला आणि तो सिद्ध झाला, तर त्याला क्राॅस प्रश्न विचारता येत नसल्याचे सांगितले. त्यावर न्यायमूर्ती माधुरी आनंद यांनी आपण यापुढे सर्व पेपर्स चीफ आणि क्राॅसचीफ झाल्यावरच रेकॉर्डवरती आणूया का? असा प्रतिप्रश्न केला. त्यानंतर ते प्रश्न मागे घेतले. या केसची पुढील सुनावणी उद्या आहे. यावेळी न्यायालयात राजू गोरे, एसीपी संगीता शिदे - अल्फान्सो, आरोपी व आरोपीचे वकील उपस्थित होते. दरम्यान, या खटल्याचा निकाल काय लागतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.