अश्विनी बिद्रे हत्याप्रकरण : खटला कमजोर करण्याचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:57 AM2018-05-25T00:57:49+5:302018-05-25T00:57:49+5:30
पतीसह भावाचा आरोप
नवी मुंबई : अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात दुसरी चार्जशीट दाखल झाली आहे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, त्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी. खटल्याचा निकाल लागेपर्यंत तपास अधिकारी संगीता अल्फान्सो यांची बदली करू नये, अशी मागणी अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबाने गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. नवी मुंबई पोलीस हे प्रकरण दाबण्याचा आजही प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सुरुवातीपासूनच नवी मुंबई पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. एकनाथ खडसे यांचा भाचा यात अडकल्याने राजकीय दबावही आणला जात असल्याचा आरोप अश्विनी यांचा भाऊ आनंद बिद्रे यांनी केला. पोलीस आमच्यावर अप्रत्यक्षपणे दबाव आणत आहेत. पत्रकार परिषदेतही साध्या वेशातील तीन ते चार पोलीस तैनात केले जात असल्याचा आरोप अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी केला. पुरावे नष्ट करून खटला कमजोर करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. त्याला विरोध केल्याने पोलीस, राजकारण्यांकडून आमच्या जिवाला धोका आहे. आमच्या कुटुंबाचे बरे-वाईट झाल्यास याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, न्याय न मिळाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा अश्विनी यांचे वृद्ध वडील जयकुमार यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे दिला.