अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण: तांत्रिक तपासावरच चार्जशीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 01:33 AM2018-05-20T01:33:07+5:302018-05-20T01:33:07+5:30

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : दोन दिवसांत दाखल होणार आरोपपत्र

Ashwini Bidre murder case: Chargesheet only on technical checks | अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण: तांत्रिक तपासावरच चार्जशीट

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण: तांत्रिक तपासावरच चार्जशीट

Next

नवी मुंबई : महिला सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाची चार्जशीट लवकरच न्यायालयात सादर केली जाणार आहे. त्यामध्ये पूर्णपणे तांत्रिक तपासातून हाती आलेले पुरावे न्यायालयापुढे मांडले जाणार आहेत. दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिला सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचे उघड करून, गुन्हे शाखा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
या गुन्ह्याचा सुरुवातीचा तपास तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक संगीता शिंदे-अल्फान्सो यांनी योग्यरीत्या केला होता. याच दरम्यान त्यांची बदली झाल्याने व तपास ढिला पडल्याने, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यावर बिद्रे कुटुंबीयांनी निष्काळजीचा आरोप केला होता, तसेच या गुन्ह्यात त्यांनाही सहआरोपी करण्याची मागणी केली होती. यामुळे सहायक आयुक्तपदी बढती व आयुक्तालयाबाहेर बदली झाल्यानंतरही बिद्रे कुटुंबीयांच्या मागणीनुसार, शासनाने अल्फान्सो यांनाच तपास अधिकारी म्हणून नेमले आहे. यानुसार, त्यांनी अल्प कालावधीतच गुन्ह्याचा उलगडा करून, पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यासह राजेश पाटील, कुंदन भंडारी व महेश पळशीकर यांना अटक केली.
तपासादरम्यान कुरुंदकर याने बिद्रे यांची हत्या करून, मृतदेहाचे तुकडे वसई खाडीत टाकल्याचे समोर आले. पोलिसांनी खाडीत मृतदेह शोधला, परंतु मृतदेहाचा थोडाही अंश हाती लागला नाही. यामुळे न्यायालयापुढे चार्जशीट मांडताना हत्येचे पुरावे सादर करण्याचे आव्हान निर्माण झाले होते, परंतु अनेक तांत्रिक बाबींद्वारे हा गुन्हा न्यायालयापुढे मांडू शकतो, असा पोलिसांचा विश्वास आहे. त्यामध्ये घटनेच्या काही दिवस दोघांचे एकत्र मोबाइल लोकेशन, राजेश पाटील याची कुरुंदकरच्या घरी उपस्थिती, बिद्रेच्या लॅपटॉपमधील माहिती यांचा समावेश असणार आहे. येत्या दोन दिवसांत ही चार्जशीट न्यायालयात सादर केली जाण्याची शक्यता आहे.
तपास अधिकारी सहायक आयुक्त संगीता शिंदे-अल्फान्सो यांना तपासाकरिता शासनाने दिलेली मुदतही ३० मे रोजी संपणार आहे. यामुळे न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुन्हा त्यांच्याकडेच तपासाची सूत्रे दिली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण?
११ एप्रिल २०१६ रोजी सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे कळंबोलीमधून बेपत्ता झाल्या. या प्रकरणी ३१ जानेवारी २०१७ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अटक झाली. त्यानंतर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील यालाही पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली असून, त्यामध्ये कुरुंदकर याचा मित्र महेश फळणीकर व चालक कुंदन भंडारी याचाही समावेश आहे. कुरुंदकर याने इतर तीन जणांच्या मदतीने अश्विनीचा खून करून, मृतदेह वसईच्या खाडीत टाकल्याची माहिती तपासात पुढे आली असून, पोलीस मृतदेहाच्या अवशेषांचा शोध घेत आहेत.

Web Title: Ashwini Bidre murder case: Chargesheet only on technical checks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.