डंपिंग बंद होईपर्यंत महासभा होऊ देणार नाही

By admin | Published: November 18, 2016 03:54 AM2016-11-18T03:54:12+5:302016-11-18T03:54:12+5:30

डंपिंग ग्राऊंडमुळे तुर्भे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

The assembly will not be held until the dumping is closed | डंपिंग बंद होईपर्यंत महासभा होऊ देणार नाही

डंपिंग बंद होईपर्यंत महासभा होऊ देणार नाही

Next

नवी मुंबई : डंपिंग ग्राऊंडमुळे तुर्भे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाचव्या सेलची क्षमता संपल्यामुळे तो तत्काळ बंद करण्यात यावा. डंपिंग बंद होईपर्यंत महासभा होवू देणार नाही, असा इशारा माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनी दिला आहे. नगरसेवकांच्या असंतोषामुळे सर्वसाधारण सभा तहकूब करावी लागली.
तुर्भे डंपिंग ग्राऊंडच्या प्रश्नाचे तीव्र पडसाद गुरूवारी सर्वसाधारण सभेमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेवून डंपिंग बंद करण्याची मागणी केली. डंपिंगमुळे तीव्र दुर्गंधी पसरू लागली आहे. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. साथीचे आजार वाढले आहेत. आम्ही आतापर्यंत खूप सहन केले, यापुढे सहन केले जाणार नाही.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका अशा शब्दात नगरसेवकांनी सुनावले. जोपर्यंत डंपिंग बंद केले जात नाही तोपर्यंत महासभा होवू दिली जाणार नाही. नागरिकांच्या आरोग्यासाठी जमिनीवर बसून आंदोलन केले जाईल. वेळ पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशारा दिला. कुलकर्णी यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष अनंत सुतार, शुभांगी पाटील, पूजा मेढकर, राधा कुलकर्णी, संगीता वास्के, मुद्रिका गवळी यांच्यासह इतर नगरसेवकांनीही डंपिंग हटावचा नारा दिला. संतप्त नगरसेवकांनी विषयपत्रिका फाडून सभागृहात फेकल्या. तत्काळ निर्णय जाहीर करावा, असे स्पष्ट केले.
महापौर सुधाकर सोनावणे यांनी नगरसेवकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने आम्ही आता माघार घेणार नाही. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने निवेदन, मोर्चे काढूनही काहीच मार्ग निघालेला नसल्याने आता डंपिंग बंद करेपर्यंत महासभा होवू देणारच नसल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले. नगरसेवक आक्रमक झाल्याने महापौर सुधाकर सोनावणे यांनी सभा तहकूब केली. डंपिंग ग्राऊंडवर शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट केली जात असल्याचा दिखावा केला जात आहे. आंदोलन केले, प्रसारमाध्यमांनी आवाज उठविल्यानंतर काही दिवस साफसफाई केली जाते, पण नंतर सर्व कामकाज ठप्प झालेले असते. फक्त दिखावेगिरी सुरू असल्यामुळे आता यापुढे माघार घेतली जाणार नसल्याचे सदस्यांनी स्पष्ट केले. पाचव्या सेलची क्षमता संपली आहे. पर्यायी व्यवस्था करण्यात अपयश आल्यामुळे तेथे अतिरिक्त कचरा टाकला जात असल्याबद्दलही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: The assembly will not be held until the dumping is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.