अलिबाग : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्रोतांचे आणि पाणीपुरवठा योजनांच्या उपांगांचे अक्षांश-रेखांशानुसार स्थळ निश्चितीकरण (अॅसेट मॅपिंग) करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोठे टंचाई आहे. अशुध्द पाण्याचा पुरवठा कोठे होतो याची माहिती संगणकाच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी दिली.नागपूर येथील एडीसीसी कंपनी आणि रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमनातून अॅसेट मॅपिंग करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सहा हजार तीन पाण्याचे स्रोत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नळ कनेक्शन, बोअरवेल आणि विहिरींचा समावेश होतो. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची अणुजैविक व रासायनिक तपासणी उपविभागीय प्रयोगशाळेमार्फत करणे, अक्षांश-रेखांश काढणे, पिण्यायोग्य पाण्याला सांकेतांक देणे, पाण्याच्या स्रोतांच्या सद्य:स्थितीविषयी नकाशे तयार करणे, अशी विविध कामे जिल्ह्यातील ८२४ ग्रामपंचायतींमध्ये करण्यात येणार आहेत.अॅसेट मॅपिंग प्रणालीद्वारे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होणार असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी सांगितले. हंगामी, बारामाही बंद असलेल्या जलस्रोतांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे पिण्यायोग्य पाण्याची माहिती नागरिकांना संगणकाच्या एका क्लिकवर मिळणार आहे. नागपूर येथील एमआरएसएसी यांच्यामार्फत मोबाइल अॅप्लिकेशन, सॉप्टवेअर, डाटा व्हॅलीडेशन, वेब पोर्टल तयार केले जाणार आहे. संबंधित संस्थेच्या कार्यप्रणालवीर सनियंत्रण करण्याचे काम भूजल सर्वेक्षण विभाग आणि जिल्हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण कक्ष करणार असल्याचे साळुंखे यांनी स्पष्ट केले. यासाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष, सचिव, जलसुरक्षक यांनी सहकार्य करण्याचे आवाहन दिलीप पांढरपट्टे यांनी केले. (प्रतिनिधी)
पाण्याचे होणार ‘अॅसेट मॅपिंग’
By admin | Published: January 09, 2016 2:13 AM