आश्रय मिळाला, तरी घरची ओढ कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 01:43 AM2020-04-28T01:43:15+5:302020-04-28T01:43:25+5:30
सध्या पनवेल महापालिका क्षेत्रातील केंद्रामध्ये अनेक लोक वास्तव्यास आहेत.
अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : लॉकडाउनदरम्यान गावी जाण्यासाठी निघालेले, गरीब, गरजू, कामगारांना प्रशासनाकडून आधार दिला जात आहे. सध्या पनवेल महापालिका क्षेत्रातील केंद्रामध्ये अनेक लोक वास्तव्यास आहेत.
दाढी-केस वाढलेले, कुणाचे लहान बाळ दुडुदुडु धावतेय तर काही महिला आपल्या सुखादु:खाच्या गुजगोष्टी करताना निवारा केंद्रात दिसत आहेत. इथे खायला-प्यायला वेळच्या वेळी मिळत आहे. आधी झोपडीत राहत होतो, इथे इमारतीत पंख्याखाली सतरंजीवर झोपतोय. तरीही गावाकडची, घरची ओढ लागल्याचे मत निवारा केंद्रातील आश्रित व्यक्त करीत आहेत.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात गरीब, मजूर, बिगारी कामगार, आपल्या उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झाले आहेत. यात हातावर पोट असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार बुडाल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. पैशाविना उपासमारीची वेळ आली आहे. गावी जावे तर वाहने बंद आहेत. काही प्रमाणात चालत गावी निघालो असता पोलिसांनी अटकाव करत निवारा केंद्रात राहण्यास सांगितले आहे. याकरिता पनवेल महापालिका क्षेत्रात बेघर, निराधार, मजूर, विस्थापितांसाठी तालुका क्रीडा संकूल, कर्नाळा स्पोर्ट्स अॅकॅडमी, व्ही.के. हायस्कूल, कळंबोली येथील काळभैरव मंगल कार्यालय या चार ठिकाणी महापालिकेकडून व्यवस्था करण्यात आली आहे.
चारही केंद्रांत १०७ व्यक्ती वास्तव्यास आहेत. दररोज अल्पोपाहार, चहा आणि दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण महापालिकेने स्थापन केलेल्या कम्युनिटी किचनद्वारे दिले जाते. त्याचबरोबर संध्याकाळी सात वाजता करमणूक तसेच दैनंदिन घडामोडीचे बातमीपत्र पाहण्याचीही सामाजिक अंतर ठेवून व्यवस्था केली आहे.
>राज्यस्थान, मध्य प्रदेश, कोकण, कर्नाटक, आंध्र प्रदेश, घाटमाथ्यावरील मजूर या चार केंद्रात आहेत. राहण्याची व्यवस्था चांगली आहे. नाश्ता-जेवण वेळेवर मिळते आहे. परंतु आई-वडील, मुले, घरी आहेत. घराची, कुटुंबाची आठवण येत असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत आहे. अनेकांच्या मोबाइलमधील रीचार्ज संपले असल्याने गावी फोन करता येत नाही आणि आपली खुशालीही कळवता येत नसल्याये दु:ख त्यांच्या चेहºयावर दिसत आहे.