Atal Bihari Vajpayee : विमानतळाचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 02:42 AM2018-08-17T02:42:19+5:302018-08-17T02:42:54+5:30

Atal Bihari Vajpayee: Prime Minister of the airport dreaming | Atal Bihari Vajpayee : विमानतळाचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान

Atal Bihari Vajpayee : विमानतळाचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान

googlenewsNext

- नामदेव मोरे
नवी मुंबई - दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ला संवर्धन व विकासासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी चालना दिली होती. किल्ल्याला भेट देऊन निधीही मंजूर केला होता. देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड नवी मुंबई विमानतळासाठी प्राथमिक तयारी त्यांच्या कार्यकाळात झाली. त्यांच्या निधनामुळे रायगडसह विमानतळ विकासाचे स्वप्न पाहणारे द्रष्टे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
१८ फेब्रुवारी २०१८ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी करण्यात आली. या वेळी पंतप्रधानांनी विमानतळाच्या प्रवासावर दृष्टिक्षेप टाकला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण वाढू लागल्यामुळे १९९८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात नवी मुंबई विमानतळाचे स्वप्न पाहण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. वाजपेयी यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकारू लागले आहे. भविष्याचा वेध घेऊन त्यांनी नवी मुंबई विमानतळासाठीची प्राथमिक तयारी सुरू केली होती. २००४ मध्ये वाजपेयी सरकार सत्तेवर असतानाच विमानतळासाठी सीआरझेड अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यासाठीची कार्यवाही सुरू झाली होती व व नवी मुंबईमधील ग्रीनफिल्ड एअरपोर्टसाठी महत्त्वाची परवानगीही मिळाली होती. यामुळे नवी मुंबईमध्ये वाजपेयी प्रत्यक्षात महत्त्वाच्या प्रकल्पाच्या भूमिपूजन किंवा उद्घाटनासाठी आले नसले तरी विमानतळासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाची चाचपणी त्यांच्याच कार्यकाळात झाली होती. वाजपेयी यांनी पाहिलेले विमानतळाचे स्वप्न राज्यात व देशात भाजपाची सत्ता असतानाच प्रत्यक्ष साकार होऊ लागले असून, वेगाने विमानतळ उभारणीची कामे सुरू झाली आहेत. ३ एप्रिल १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी रायगड किल्ल्याला भेट दिली होती. या वेळी त्यांनी रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधीची घोषणाही केली होती. मराठा साम्राज्याचे प्रतीक असलेल्या या किल्ल्याचे संवर्धन होण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर भाजपाचीच सत्ता असताना रायगड किल्ला संवर्धनासाठी ६०० कोटींचा निधी मंजूर करून प्रत्यक्षात कामांना सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यातील विमानतळ व दुर्गदुर्गेश्वर रायगडच्या संवर्धनाचे स्वप्न पाहणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड
गेल्यामुळे मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे.

देशाच्या राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांनी आयुष्यभर देशहिताचा विचार केला व देशाला प्रगतिपथावर नेणारे अनेक निर्णय घेतले. चारित्र्यसंपन्न व कवी मनाचे नेतृत्व हरपले असून, देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.
- मंदा म्हात्रे,
आमदार, बेलापूर मतदार संघ

देशाच्या प्रगतीमध्ये अतुलनीय योगदान देणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्यासोबत आमच्या वडिलांनी प्रत्यक्षात काम केले आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशहिताचा विचार करणाऱ्या नेतृत्वाने अखेरचा श्वास घेतला असल्यामुळे देशाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.
- सुरेश हावरे,
अध्यक्ष, शिर्डी साई संस्थान

राजकारणामध्ये अनेक तपे कार्यरत राहूनही मनाची संवेदनशीलता त्यांनी कधीच कमी होऊ दिली नाही. ‘जय जवान व जय किसान’ची व्याप्ती त्यांनी ‘जय विज्ञान’पर्यंत नेली. देशाला महासत्ता बनविण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले असून, त्यांच्या जाण्याने देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.
- प्रशांत ठाकूर,
आमदार, पनवेल

स्वातंत्र्यापासूनच्या सर्वात चांगल्या व देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणाºया पंतप्रधानांमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचा समावेश आहे. त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन देशाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या मृत्यूमुळे देश द्रष्ट्या नेतृत्वाला मुकला आहे.
- जयवंत सुतार,
महापौर, नवी मुंबई महापालिका

अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान व एकूणच राजकीय वाटचालीमध्ये केलेले काम अतुलनीय आहे. त्यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही. त्यांचे कार्य भविष्यातही प्रेरणा देत राहील.
- मारुती भोईर,
ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा

अटलबिहारी वाजपेयी देशाचे महानेते होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी खर्ची केले. विरोधी पक्षात असतानाही तत्कालीन पंतप्रधानांनी युनायटेड नेशनमध्ये देशाची बाजू मांडण्यासाठी त्यांना पाठविले होते.
- सतीश निकम,
जिल्हा सरचिटणीस भाजपा

Web Title: Atal Bihari Vajpayee: Prime Minister of the airport dreaming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.