अटल सेतू-विमानतळ सागरी मार्ग दृष्टिपथात
By नारायण जाधव | Published: March 6, 2024 10:06 PM2024-03-06T22:06:42+5:302024-03-06T22:11:45+5:30
सागरी मार्गाचा खर्च २३० कोटींनी वाढला
नवी मुंबई : सिडकोने प्रस्तावित केलेला अटल सेतू ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा थेट सात किलोमीटर लांबीचा नवा सागरी मार्ग आता लवकरच साकारला जाणार आहे. या मार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, जे. कुमार कंपनीने बाजी जिंकली आहे. सिडकोने या सागरी रस्त्यासाठी आधी ६८१ कोटी ६३ लाख रुपये खर्च प्रस्तावित केला होता; मात्र आता परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने तो २३० कोटींनी वाढून ९१२ कोटी २८ लाखांवर गेला आहे. ३० महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे बंधन आहे.
असा असेल सागरी मार्ग
१ - अटल सेतू जंक्शनपासून ते आम्र मार्ग जंक्शनपर्यंत तो बांधण्यात येणार असून, त्याची लांबी सात किमी इतकी आहे. यात मूळ रस्ता ५.८ किमी असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी मार्गिका १.२ किमी आहे.
२ - नवी मुुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे येण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याची एक मार्गिका उलवेजवळच्या शिवाजीनगर येथे तर दुसरी मार्गिका चिर्ले जंक्शनजवळ उतरवली आहे. शिवाजीनगर मार्गिकेवरून नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी सिडको हा सात किमीचा सागरी मार्ग बांधत आहे.
३ - काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना वाहतुकीचा नवा मार्ग उपलब्ध होणार आहे. सध्याच्या पाम बीच रोड, आम्र मार्ग, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४८ वरील वाहतुकीचा भार कमी होऊन सुरळीत प्रवास करणे शक्य होणार आहे. या मार्गावरून विमानतळाच्या दिशेने डाव्या बाजूला नवी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठीही मार्गिका असणार आहे. यामुळे शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्गावरून बेलापूर, नेरुळ, सीवूड, सानपाडातील प्रवाशांनाही तो सोयीचा ठरणार आहे.
जळगाव जिल्ह्यात वृक्षांची लागवड
- मार्गाच्या कामासाठी ३,७२८ खारफुटींची कत्तल करावी लागणार असून, त्यासाठी पनवेल तालुक्यातील न्हावे येथील ३२.६९ हेक्टर राखीव वनजमीन वळती केली आहे. या नुकसानीच्या बदल्यात शेवरे खुर्द, ता. पारोळा, जि. जळगाव येथे देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड सिडको करणार आहे.
वन्यप्राण्यांच्या जीवनमानावरील परिणामांचा अभ्यास
- हा मार्ग फ्लेमिंगो पक्षांच्या अधिवास क्षेत्रातून जात असल्याने त्याचे बांधकाम सुरू असताना आणि पूर्ण झाल्यानंतरही किमान दोन वर्षांपर्यंत त्याच्यामुळे फ्लेमिंगो पक्षांसह समुद्री पक्षी आणि वन्यप्राण्यांच्या जीवनमानावर काय बरे-वाईट परिणाम झाले, याचे निरीक्षण मुंबई विद्यापीठाच्या झुनझुनवाला महाविद्यालयाकडून करून त्याचा अहवाल पाठवावा, अशी सूचना वने आणि पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी देताना केली आहे.
बाधित मच्छीमारांना भरपाई ?
- सागरी मार्गाच्या बांधकामामुळे मच्छीमारांचा येण्या-जाण्याचा मार्ग, खाडी प्रदूषण होऊन त्यांच्यावर परिणाम व्हायला नको, याची दक्षता सिडकोस घ्यावी लागणार आहे. कदाचित, बाधित मच्छीमारांना नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे.