अटल सेतूच्या कास्टिंग यार्डला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नव्हती परवानगी

By नारायण जाधव | Published: July 13, 2024 05:20 PM2024-07-13T17:20:25+5:302024-07-13T17:20:52+5:30

माहिती अधिकारातून मंडळाने फोडले बिंग

atal setu casting yard was not permitted by the pollution control board | अटल सेतूच्या कास्टिंग यार्डला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नव्हती परवानगी

अटल सेतूच्या कास्टिंग यार्डला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नव्हती परवानगी

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : बहुचर्चित अटल सेतूच्या कास्टिंग यार्डसाठी दिलेला १२ हेक्टर भूखंड सिडकोने कोणताही करारनामा न करताच एमएमआरडीएला दिला असल्याचे माहिती अधिकारातून जून महिन्यात उघड झाले होते. त्यापाठोपाठ या कास्टिंगसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचीही परवानगी घेतलेली नसल्याचे उघड झाले आहे.

नवी मुंबईतील नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी उलवे येथी सीआरझेड क्षेत्रात सिडकोने दिलेल्या १२ हेक्टर भूखंडावर उभारलेल्या कास्टिंग यार्डसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दिलेल्या परवानगीची प्रत माहिती अधिकार कायद्यान्वये मागितली होती. त्यावर दिलेल्या उत्तरात प्रदूषण नियंत्रण मंडळाने, अशी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले आहे.

आधी भूखंड करारनाम्याबाबत एममएमआरडीएने दिलेले आणि आता प्रदूषण नियंत्रण मंडळाची नसलेली परवागनी पाहता या कास्टिंग यार्डबाबत अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. उलवे खाडीकिनारी अटल सेतूसाठी ते बांधले होते. यासाठी खाडीकिनारी मोठ्याप्रमाणात भराव आणि खारफुटीची कत्तल केली आहे. भरावामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसानही झाले आहे. तसेच मशिनरीची नेआण केली आहे. शिवाय काँक्रिट तयार करण्यासाठी मोठ्याप्रमाणात रसायनांचे मिश्रण करून डांबर प्लॉन्ट टाकला. या सर्वांसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवागनी घेणे बंधनकारक आहे. मात्र, असे काहीही न करता एमएमआरडीए आणि विकासक कंपनी एल ॲन्ड टीने मोठे पर्यावरण उल्लंघन केले असल्याचे नॅट कनेक्टचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले.

बालाजी मंदिराचा वाद एनजीटीत

अटल सेतूचे काम पूर्ण झाल्यानंतर कास्टिंग यार्डची तशी गरज नसल्याने या १२ हेक्टर भूखंडापैैकी १० हजार चौरस मीटर भूखंड सिडकोने तिरुमला देवस्थान ट्रस्टला भगवान तिरुपती बालाजी मंदिर बांधण्यासाठी दिला आहे. मात्र, सीआरझेड क्षेत्रात मंदिर बांधण्यास पर्यावरणप्रेमींनी हरकत घेतली आहे. आमचा मंदिरास विरोध नाही. परंतु, ते इतरत्र बांधायला हवे, असे सांगून पर्यावरणप्रेमींनी याविराेधात लढा सुरू केला आहे. नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी, तर थेट राष्ट्रीय हरित लवादात धाव घेतली आहे.

Web Title: atal setu casting yard was not permitted by the pollution control board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.