‘अथर्व’च्या कामात घोटाळा!

By admin | Published: February 3, 2017 02:48 AM2017-02-03T02:48:45+5:302017-02-03T02:48:45+5:30

सिडकोने २०१० मध्ये मनुष्यबळ पुरविण्यासाठी अथर्व फॅसिलिटी या ठेकेदाराची नियुक्ती केली होती. ठेकेदाराने चार वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन दिले नाही. त्यांच्या

'Atharva' work scam! | ‘अथर्व’च्या कामात घोटाळा!

‘अथर्व’च्या कामात घोटाळा!

Next

नवी मुंबई : सिडकोने २०१० मध्ये मनुष्यबळ पुरविण्यासाठी अथर्व फॅसिलिटी या ठेकेदाराची नियुक्ती केली होती. ठेकेदाराने चार वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन दिले नाही. त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचाही अपहार केला आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याऐवजी फक्त काळ्या यादीत टाकून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नवी मुंबईचा विकास करणाऱ्या सिडको प्रशासनाकडे विमानतळ व इतर प्रकल्पामुळे मनुष्यबळाची कमतरता भासू लागली. कायमस्वरूपी नोकरभरती करता येत नसल्याने गरजेप्रमाणे मनुष्यबळ पुरविण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. नोव्हेंबर २०१० मध्ये अथर्व एजन्सीला हे काम देण्यात आले. विशेष म्हणजे निविदा न मागविता हा ठेका देण्यात आला. यावरून वादळ उठल्याने २०१२ मध्ये निविदा मागविण्यात आल्या. यामध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या अथर्वलाच हे काम देण्यात आले. जवळपास सहा वर्षांपासून अथर्वच्या माध्यमातून मनुष्यबळ पुरविले जात आहे. नियमाप्रमाणे ठेकेदाराने कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम संबंधित विभागाकडे भरणे आवश्यक होते. पण ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे खातेच उघडले नाही. सिडकोकडून कर्मचाऱ्यांसाठीची सर्व रक्कम घेतली, पण ती कर्मचाऱ्यांना दिलीच नाही. कर्मचाऱ्यांना वेतनही अत्यंत कमी देण्यात येत होते. सहा वर्षांमध्ये भविष्यनिर्वाह निधीचे लाखो रूपये हडप करण्यात आले.
सिडकोमधील अथर्वच्या कामाची चौकशी करण्याची मागणी सानपाडामधील सामाजिक कार्यकर्ते सुरेश मढवी यांनी केली होती. ठेकेदाराने कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भरलेली नाही. पूर्ण पगार देण्यात येत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. याविषयी भविष्यनिर्वाह निधीपासून राज्य व केंद्र शासनाकडेही तक्रारी केल्या होत्या. याविषयी वाद वाढू लागल्याने सिडको प्रशासनाने अथर्व या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले आहे. त्याचा कामाची मुदत संपल्याने क्रिस्टल एजन्सीची नियुक्ती केली आहे. सिडकोने कर्मचाऱ्यांसाठी दिलेले पैसे ठेकेदाराने स्वत:च्या फायद्यासाठी वापरले असतील तर संबंधितांवर अपहार केल्याचा गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. परंतु तसे न करता या गैरव्यवहारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. (प्रतिनिधी)

अपहाराचा गुन्हा दाखल करा
सिडकोने अथर्व एजन्सीची नियुक्ती केली होती. कर्मचाऱ्यांसाठीची सर्व रक्कम ठेकेदाराला नियमितपणे देण्यात आली आहे. पण कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्ण दिले नाही व भविष्यनिर्वाह निधीची रक्कमही भरण्यात आलेली नाही. यामुळे सिडकोच्या निधीचा अपहार झाला असून या प्रकरणी चौकशी करून सत्य आढळल्यास गुन्हा दाखल होण्याची मागणी होवू लागली आहे.

कारवाई टाळण्यासाठी दबाव
मनुष्यबळ पुरविण्याच्या ठेक्यामागे काही जणांचे हितसंबंध दडले असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. यामुळे तक्रारी करूनही ठेकेदाराने सहा वर्षांत केलेल्या कामाचे लेखा परीक्षण करून गैरव्यवहार झाला की नाही हे तपासण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही होत आहे.

Web Title: 'Atharva' work scam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.