महापालिकेच्या क्रीडा सुविधांवर खेळाडूंची पसंतीची मोहर!
By योगेश पिंगळे | Published: April 18, 2024 03:38 PM2024-04-18T15:38:57+5:302024-04-18T15:38:57+5:30
गतवर्षी ५८ लाख रुपयांचा महसूल प्राप्त : क्रीडांगणांना वाढती मागणी
नवी मुंबई : शहरातील खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारांचा सराव करता यावा तसेच, शहरात खेळाडू घडावेत यासाठी महापालिकेने खेळांच्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विविध संस्था, मंडळे, शाळा, महाविद्यालयांना अल्प प्रमाणात भाडे आकारून मैदाने, क्रीडांगणे भाड्याने दिली जातात. या सर्वच सुविधांना खेळाडूंचीदेखील मोठी मागणी असून क्रीडांच्या विविध सुविधांमधून गतवर्षात महापालिकेला सुमारे ५८ लाख २९ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
शहरातील खेळाडूंना खेळण्यासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारांतील खेळाडू शहरात घडावेत, यासाठी महापालिकेने सीबीडी येते राजीव गांधी स्टेडियम, नेरूळ येथे कै. यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगण, सीबीडी व घणसोली येथे मल्टिपर्पज टर्फ, घणसोली व नेरूळ येथील स्केटिंग पार्क, फिटनेस सेंटर आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून बुकिंगसाठी अनेक जण प्रतीक्षेत असतात. मागील वर्षी सीबीडी येथील राजीव गांधी स्टेडियमच्या माध्यमातून महापालिकेला १५ लाख १७ हजार २८० रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
यशवंतराव चव्हाण क्रीडांगणालादेखील फुटबॉलप्रेमींनी पसंती दिली असून १४ लाख ५८ हजार ७४ रुपयांचा महसूल सीबीडी येथील मल्टिपर्पज टर्फ ६ लाख ७५ हजार ५२१ घणसोली सेंट्रल पार्क मल्टिपर्पज टर्फ १३ लाख ९२ हजार ६७८ रुपये, घणसोली स्केटिंग रिंक ४ लाख ५४ हजार ९४६ नेरूळ स्केटिंग पार्क १ लाख ४७ हजार ९० आणि सीबीडी येथील फिटनेस सेंटरच्या माध्यमातून १ लाख ८३ हजार ९०० रुपये याप्रमाणे ५८ लाख २९ हजार ४८९ रुपयांचा महसूल महापालिकेला प्राप्त झाला आहे. २०२२ -२३ या वर्षात या क्रीडा सुविधांच्या माध्यमातून ४४ लाख ४४ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. गतवर्षी महसूलात मोठी वाढ झाली असून महापालिकेच्या क्रीडा सुविधांचा वापर करणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे.
शहरात विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडू घडावेत, यासाठी महापालिकेचा क्रीडा विभाग आग्रही असून त्याअनुषंगाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शहरातील आठ मैदानांमध्ये विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून याबाबत आयुक्तांशी चर्चा झाली आहे. मैदानांमध्ये विविध क्रीडा सुविधा उपलब्ध झल्यास युवा खेळाडूंना सराव करता येणार असून, नवीन खेळाडू घडण्यास नक्कीच मदत होईल.
-ललिता बाबर, उपआयुक्त, क्रीडा विभाग, नमुंमपा.