- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : कोरोनामुळे क्रीडा क्षेत्रावर बंधने आल्याने खेळाडूंना भवितव्याची चिंता सतावू लागली आहे. मागील नऊ महिन्यांपासून त्यांचे प्रत्यक्ष मैदानी सराव बंद आहेत. परिणामी, आगामी काळात स्पर्धा झाल्यास त्यांना छाप उमटवणे अवघड होणार आहे. मागील दोन महिन्यांपासून राज्य टप्प्याटप्प्याने अनलॉक होऊ लागले आहे. मात्र, अद्यापही क्रीडा क्षेत्राविषयी राज्य सरकारने कोणतेही स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे शासनाच्या, तसेच खासगी क्रीडा अकॅडमी बंदच आहेत. यामुळे स्थानिक पातळीवरील खेळाडूंसह राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर मैदानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचा सराव पूर्णपणे बंद आहे. पावसाळ्याचा कालावधी हा खेळाडूंच्या सरावाचा कालावधी असतो, तर नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात. मात्र, कोरोना व लॉकडाऊन यामुळे खेळाडूंचा सरावाचा कालावधी घरातच गेला आहे.नवी मुंबईत अधिकाधिक खेळाडू घडविण्यावर पालिकेचा जोर आहे. त्याकरिता पालिकेचेही क्रीडा प्रशिक्षण केंद्र असून, तेही सध्या बंद आहे. शहरात सध्या राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तराचे पाचशेहून अधिक खेळाडू घडत आहेत. कबड्डी, खो-खो, क्रिकेट, तायक्वांडो, जलतरण यासह अनेक स्पर्धांमध्ये ते ठसा उमटवत आहेत. त्यांच्या कामगिरीमुळे शहराचा नावलौकिक वाढत आहे. मात्र, कोरोनाने या खेळाडूंचे वर्ष गिळल्याने चालू वयोगटातील स्पर्धेतल्या संधी गमवाव्या लागणार आहेत.त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लॉकडाऊनमुळे खेळाडूंचा मैदानी सराव पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी, आगामी काळात स्पर्धेत उतरण्यापूर्वी त्यांना अधिक सरावाची गरज भासणार आहे. त्यामध्ये त्यांच्या अनेक सुवर्णसंधी हातून निसटण्याची शक्यता आहे.- श्रीनिवास गुप्ता, ॲथलेन्टिक प्रशिक्षक
देशात, तसेच देशाबाहेर जलतरण स्पर्धा सुरू आहेत. मात्र, महाराष्ट्रात अद्याप तरणतलाव खुले नसल्याने सराव थांबला आहे. याचा परिणाम खेळाडूंवर, तसेच राज्याच्या दर्जावर होणार आहे.- ज्योत्स्ना पानसरे, आंतराष्ट्रीय जलतरणपटू